भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती यांच्या भाषणावर टीकेची झोड उठवणाऱ्या काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. प्रत्येक भाषणात पंडित नेहरूंचा उल्लेख असावा, हा काँग्रेसचा अट्टाहासच नेहरूंची प्रतिमा ढासळण्यासाठी कारणीभूत असल्याचे प्रसाद यांनी म्हटले. रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केली. यावेळी त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, या भाषणात कोविंद यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करणे टाळले होते. विशेष म्हणजे यावेळी कोविंद यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा उल्लेख केला. याच मुद्द्यावरून काँग्रेसने रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर टीकेची झोड उठवली. आपण आता भाजपचे उमेदवार राहिलेलो नाही, याचे भान राष्ट्रपतींना असायला हवे होते. ते आता संपूर्ण देशाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना घटनेचे रक्षण करायचे आहे आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते.

या टीकेला प्रत्युत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, कोविंद यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांच्या विचासरणीवर भाष्य केले. त्यांनी सरदार पटेलांच्या असामान्य योगदानाबद्दल सांगितले. मात्र, काँग्रेस पक्ष प्रत्येक भाषणात नेहरूंचा उल्लेख हवा, असा हट्ट धरून त्यांची प्रतिमा खुजी करत आहे. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी प्रत्येक मुद्द्याचे राजकारण करू नये, असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला.

देशाचा प्रत्येक नागरिक राष्ट्र निर्माता, पहिल्याच भाषणात राष्ट्रपती कोविंद यांचा सर्वसामान्यांना सलाम

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती बनले आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस.केहर यांनी त्यांना शपथ दिली. शपथ ग्रहण केल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर लगेचच ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’चे नारे देण्यात आले. संसद भवनात ‘जय श्री राम’चे नारा देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही भाजप सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर आयोजित स्वागत समारंभावेळीही असा नारा देण्यात आला होता. त्यावेळी ‘जय श्री राम’बरोबर ‘मोदी-मोदी’ अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या.