‘पीटीआय’ची दिलगिरी; संबंधित छायाचित्रकाराला अर्धचंद्र

मुसळधार पावसाने पाण्याखाली गेलेले विमानतळ अहमदाबादचे नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर ‘पीटीआय’ या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने अहमदाबाद विमानतळाची म्हणून प्रसिद्ध केलेली छायाचित्रे २०१५ मधील महापुरादरम्यान पाण्याखाली गेलेल्या चेन्नई विमानतळाची असल्याचेही उघड झाले. ही गंभीर चूक केंद्रीय माहिती व प्रसारण आणि वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणींनी लक्षात आणून दिल्यानंतर ‘पीटीआय’ने दिलगिरी व्यक्त करून संबंधित छायाचित्रकाराला अर्धचंद्र दिला.

मुसळधार पावसाने अहमदाबादचे सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात बुडाल्याचे आणि विमाने पाण्यावर तरंगत असल्याची ओळ देऊन  ‘पीटीआय’ने कथित अहमदाबाद विमानतळाची छायाचित्रे गुरुवारी प्रसिद्ध केली. विश्वासार्ह मानल्या जात असलेल्या ‘पीटीआय’ने ती दिल्यामुळे देशातील अनेक नामवंत माध्यमांनी ती छायाचित्रे पहिल्या पानावर प्रसिद्ध केली. अनेक माध्यमांच्या वेब आवृत्त्यांमध्येही ती प्रसिद्ध झाली. त्यावरून सामाजिक माध्यमांवर मोदी सरकारची यथेच्छ खिल्ली उडविणेही सुरू झाले होते; पण दुसरीकडे ‘पीटीआय’कडून झालेली ही गडबड पहिल्यांदा उमगली ती सामाजिक माध्यमांनाच. २०१५ मधील चेन्नई विमानतळाची आणि अहमदाबाद विमानतळाची म्हणून ‘पीटीआय’ने प्रसिद्ध केलेली छायाचित्रे एकच असल्याचे दाखविणारे ट्वीट्स काहींनी केले, पण त्याची ‘पीटीआय’ने दखल घेतली नव्हती.

शुक्रवारी सकाळी बहुतेक राष्ट्रीय माध्यमांच्या पहिल्या पानावर ‘पाण्याखालील अहमदाबाद विमानतळा’ची छायाचित्रे प्रसिद्ध होताच इराणींनी सकाळी नऊच्या सुमारास ‘पीटीआय’ला चूक दाखवून दिली. राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी त्या गुरुवारी अहमदाबाद- गांधीनगरलाच होत्या. सुमारे तीन तासांच्या छाननीनंतर ‘पीटीआय’ला चूक उमगली आणि त्यांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केली. तसेच या गंभीर प्रकाराबद्दल संबंधित छायाचित्रकाराला तातडीने कामावरून कमी केले. त्या छायाचित्रकाराचे नाव मात्र उघड केले नाही. दुसरीकडे अहमदाबाद विमानतळाचे संचालक मनोज गांगल यांनीही प्रसिद्ध झालेली छायाचित्रे संपूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले. विमानतळावरील सेवा सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे वृत्त माध्यमांनी दिले.