पुलवामा हल्ल्यावरुन पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटारेडापणा करत पीओकेमध्ये दहशतवाद्यांचा कोणताच तळ नसल्याचे म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून सोपवण्यात आलेल्या ‘डॉजियर’ च्या सुरूवातीचा तपास भारताला सादर केला आहे. भारताने सांगितलेल्या २२ प्रमुख जागांचा तपास केला आहे. पण तिथे एकही दहशतवादी शिबीर आढळून आलेले नाही. जर भारताने विनंती केली तर तुम्हाला या जागेचा दौरा करण्यास आणि निरीक्षण करण्यास परवानगी देऊ शकतो, असेही पाकने म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या ५४ लोकांचा संबंध यात संबंध असेल असे काहीही आढळून आले नसल्याचा दावा पाकने केला आहे. तसेच भारताने विनंती केली तर त्यांना आम्ही संबंधित जागेवर जाण्याची परवानगी देऊ, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताने २७ फेब्रुवारीला नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या प्रभारी उच्चायुक्तांकडे पुरावे सादर केले होते. यामध्ये पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा पुलवामा हल्ल्यात सहभाग असण्याबरोबरच जैशच्या दहशतवादी तळांबाबत विस्तृत पुरावे सादर केले होते. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.