पुण्यातील सीरम संस्था, हैदराबादमधून विमाने रवाना

वृत्तसंस्था, नवी दिल्ली, पुणे</strong>

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मधील कोविड -१९ प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीचा पहिल्या टप्प्यातील साठा दिल्लीत पोहोचवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी हा साठा पुण्यातून पाठविण्यात आला.  तो काही तासांतच विमानाने दिल्लीत पोहोचला. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार असून त्याची पूर्वतयारी झाली आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, पुण्याहून १३ शहरांत लस पोहोचवण्यासाठी चार एअरलाइन्सची विमाने नऊ उड्डाणे करणार आहेत. एकूण ५६.५ लाख डोस पहिल्या खेपेत देशभरात पाठवले जाणार आहेत. कोव्हिशिल्ड ही लस ब्रिटिश स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केली असून ती भारतात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड नावाने उत्पादित केली आहे. स्पाइस जेटची दोन विमाने व गो एअरची विमाने यांनी लस पुण्याहून दिल्लीत आणली. नंतर ती चेन्नईला पाठवण्यात आली.

स्पाइसजेटचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले की, पुण्याहून १०८८ किलो वजनाची ३४ खोकी  दिल्लीला आणली गेली.  स्पाइस जेटच्या विमानाने आणलेली लस सकाळी दहा वाजता दिल्लीत पोहोचली. तापमान नियंत्रक ट्रक लस घेऊन सीरम इन्स्टिटय़ूटमधून निघण्यापूर्वी तेथे पहाटे पाच वाजता पूजाविधी करण्यात आले.

लस बेंगळुरूत दाखल

कोविड १९ प्रतिबंधक लस आता बेंगळुरूतही पोहोचली असून लसीकरण कार्यक्रम पारदर्शक पद्धतीने राबवला जाईल, असे सरकारने म्हटले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हिशिल्ड लशीचा साठा घेऊन एक विमान केम्पगौडा विमानतळावर आले.  कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की, ६ लाख ४७ हजार ५०० डोस बेंगळुरू व बेळगावी येथे आले आहेत. आता पुढील टप्पातील साठा बुधवारी मिळणार आहे. लसीकरण १६ जानेवारीला सुरू होत असून  आघाडीच्या कर्मचाऱ्यांना ही लस पहिल्या टप्प्यात २३५ शहरांत दिली जाणार आहे. देशाच्या औषध महानियंत्रकांनी कोव्हिशिल्ड या लशीला मान्यता दिल्यानंतर १.१ कोटी डोसची मागणी नोंदवण्यात आली होती.

भारत बायोटेकही सज्ज

हैदराबाद :भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीला कोव्हिशिल्डसमवेत आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली असून त्यांची लसही पाठवणीसाठी सज्ज आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लशीचा साठा सज्ज ठेवण्यात आला होता. सायंकाळी हैदराबाद येथून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचा साठा ११ ठिकाणी रवाना करण्यात आला आहे.  हैदराबाद हे लस निर्मितीचे एक प्रमुख केंद्र आहे. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस मानली जात असून ती भारतीय वैद्यक संशोधन परिषद व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संशोधन संस्था यांनी तयार केली आहे. भारत बायोटेकच्या बीएसएल ३ प्रकल्पात ही लस तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.

लस वितरणातील घडामोडी

* पुणे विमानतळाने म्हटले आहे की,  लस विमानाने वेगवेगळ्या शहरांत वाहून नेण्यात येत आहे. एअर इंडियाने २ लाख ७६ हजार डोस आणले असून त्यांचे वजन ७०० किलो आहे. पुण्याहून अहमदाबादला ही लस पाठवण्यात आली.

* इंडिगोने पुण्याहून चंडीगडला ९०० किलो वजनाचा लस साठा वाहून नेला.

* लखनौत दोन विमाने लस घेऊन आली आहेत. गुवाहाटी,कोलकाता, हैदराबाद, भुवनेश्वर, बेंगळुरु, पाटणा, विजयवाडा येथे मंगळवारीच लस पाठवण्याचे नियोजन होते.  स्पाइस जेट त्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगण्यात आले.

* सरकारने सोमवारी ११० दशलक्ष डोसची मागणी सीरमकडे नोंदवली होती. भारत बायोटेककडेही  मागणी नोंदवण्यात येणार आहे.

‘जगात सर्वात स्वस्त’

कर्नाटकचे आरोग्यमंत्री सुधाकर यांनी असा दावा केला की, दुसऱ्या कुठल्याही देशातील सरकारने लशीची इतकी कमी किंमत निर्धारित केलेली नाही. लस २१० रुपयांची असून एकूण खर्च २३१ कोटी रुपये आहे. केंद्र सरकार पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांचे लसीकरण मोफत करणार आहे. प्रत्येक कुपीत ५ मि.ली औषध असून एका डोससाठी ०.५ मि.ली पुरेसे असते. त्यामुळे एका कुपीत दहा लोकांचे लसीकरण होणार आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यामुळे लोकांमध्ये विषाणूविरोधात प्रतिकारक्षमता तयार होईल.