भारत-पाकिस्तान क्रिकेट मंडळांमधील प्रस्तावित चर्चेला विरोध करत बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून राडा घालण्याऱया शिवसेनेविरोधात पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेने शिवसेनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे.

पाकिस्तानी खेळाडू, कलाकारांना शिवसेनेचा विरोध राहीला आहे. नुकतेच पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाचाही शिवसेनेने विरोध केला. तर, सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात घूसून भारत-पाक क्रिकेट मंडळादरम्यान होणारी प्रस्तावित चर्चेला विरोध करत राडा घातला. याप्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेत शिवसेनेविरोधात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिवसेनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) आमदार फैज मलिक यांनी मांडला आणि विधानसभेने तातडीने प्रस्ताव स्वीकारला. या प्रस्तावातून शिवसेनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे करण्यात आली आहे.