टाटा मोटर्सला तिमाहीत २७००० कोटींचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे. JLR अर्थात जॅग्वॉर लॅन्ड रोव्हर ची सातत्याने सुमार कामगिरी झाल्याने हा तोटा झाल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. डिसेंबर अखेरच्या तिमाहीत टाटा मोटर्सला २६ हजार ९९३ कोटींचा तोटा झाला आहे. याआधीच्या तिमाहीत १०७७ कोटींचा फायदा कंपनीला झाला होता. यानंतर ७७२ कोटींचा फायदा होईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही.

JLR ला २७ हजार ८३८ कोटींचे नुकसान नॉन कॅश राइट ऑफमुळे झाले. टाटा मोटर्सने या तोट्याची कारणं देताना चीनमध्ये विक्रीला लागलेली खिळ, वाढते कर्ज आणि वाढलेला उत्पादन खर्च अशी कारणं दिली आहेत. JLR अर्थात जॅग्वॉर लँड रोव्हरच्या टाटा मोटर्सच्या महसूलात सुमारे ७२ टक्के वाटा आहे. २०१८ मध्ये मात्र या कार्सच्या विक्रीचा आलेख मंदावला. या सगळ्या कारणांमुळेच टाटा मोटर्सला मोठे नुकसान झाले असे कंपनीने म्हटले आहे.

युरोपात डिझेलवर चालणाऱ्या JLR चे प्रमाण ९० टक्के होते. मात्र हळूहळू ही मागणी कमी झाली. कारण ग्राहक हळूहळू हायब्रिड किंवा इलेक्ट्रीक कार्सचा पर्याय निवडू लागेल. पर्यावरणात प्रदूषण होऊ नये याबाबत ग्राहक जागरुक असतात. मात्र आता या कारच्या विक्रीचा वेग अत्यंत मंदावल्याने आम्हाला तोटा सहन करावा लागतो आहे असे टाटा मोटर्सने स्पष्ट केलं आहे.