काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी महालेखा परीक्षकांची (कॅग) भेट घेऊन राफेल लढाऊ जेट विमानांच्या प्रकरणी झालेल्या गैरप्रकारांबाबतचा अहवाल लवकर सादर करण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कॅगला निवेदन सादर केले असून त्यात म्हटले आहे, की कॅगच्या अहवालामुळे राफेल जेट विमान खरेदीतील गैरप्रकार जाहीर होतील व सत्य समजेल. वरिष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी कॅगच्या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितले, की आम्ही राफेल प्रकरणातील जे गैरप्रकार आहेत त्याची माहिती निवेदनासोबत जोडली असून कॅग या प्रकरणी लगेच अहवाल तयार करील व तो संसदेत मांडला जाईल, अशी अपेक्षा आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले, की राफेल प्रकरणातील सर्व पुरावे व तथ्ये कॅगला आम्ही सादर केली आहेत. खासगी कंपनीच्या फायद्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला या करारातून बाहेर काढण्यात आले. त्याची माहितीही यात दिली आहे.

कॅग त्यांचा अहवाल लवकर सादर करील अशी अपेक्षा अ हे. या प्रकरणातील सर्व पैलूंचा विचार करण्यात येत आहे, असे कॅगने सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा अहवाल जाहीरपणे लोकांसमोर मांडला जाईल व खरा गैरव्यवहार उघड होऊन सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा सूरजेवाला यांनी व्यक्त केली. राफेल जेट विमान खरेदी प्रकरणत काँग्रेसने सरकारला धारेवर धरले असून भाजप व काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राफेल विमान खरेदीतील भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा करण्याचा काँग्रेसचा इरादा आता उघड आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafale deal scandals cag
First published on: 20-09-2018 at 00:50 IST