देशात एका मागोमाग एक घोटाळे उघडकीला येत आहेत. अशात बंगळुरु येथील एका इनव्हेस्टमेंट फर्मने टीम इंडियाचा माजी कप्तान राहुल द्रविड, टेनिसपटू साइना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांच्यासह ८०० जणांना ३०० कोटींचा चुना लावल्याची बाब उघड झाली आहे. बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम इनव्हेस्टमेंट कंपनीने ८०० गुंतवणूकदारांना चुना लावला आहे. या ८०० जणांच्या यादीत खेळ, सिनेमा आणि राजकीय जगतातील अनेक व्यक्तींचा समावेश असल्याचेही समजते आहे. या तिघांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे अशीही माहिती मिळाली आहे.

कर्नाटकातील बंगळुरु या ठिकाणी असलेल्या विक्रम इनव्हेस्टमेंट कंपनीने राहुल द्रविड, साइना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांसारख्या ८०० जणांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीप्रकरणी कंपनीचे मालक राघवेंद्र श्रीनाथ, एजंट म्हणून काम करणारे सुतराम सुरेश, नरसिंहामूर्ती, केसी. नागराज आणि प्रह्लाद या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तसेच या सगळ्यांना १४ दिवसांची कोठडीही सुनावण्यात आली आहे. या कंपनीने ८०० जणांना ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला चुना लावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुंतवणूकदारांशी चर्चा केल्यावर या संदर्भातली नावे समजले असल्याचे समोर आले आहे.

पोलीस आता या कंपनीच्या बँक खात्यांची माहिती घेत आहेत. तसेच कंपनीच्या विविध कागदपत्रांचीही पाहणी केली जाते आहे. बंगळुरु येथे काम करणारे क्रीडा पत्रकार सूत्रम सुरेश यांनाही अटक करण्यात आली आहे. विक्रम इनव्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवावेत यासाठी सूत्रम सुरेशने प्रकाश पदुकोण, राहुल द्रविड आणि साइना नेहवाल यांना गळ घातली होती. सुरेशने सांगितलेल्या गुंतवणुकीच्या योजनेवर विश्वास बसल्यानेच या तिघांनी या कंपनीत पैसे गुंतवले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अनेक गुंतवणूकदारांनी चांगला परतावा मिळेल या स्वार्थापोटीही पैसे गुंतवले होते. सगळ्या आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. त्यांच्या चौकशीतून इतरही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. फसवणूक करणाऱ्या या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ४० टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देण्याचे आश्वासन दिले होते. या सगळ्या फसवणुकीच्या प्रकरणात राहुल द्रविड, साइना नेहवाल किंवा प्रकाश पदुकोण यांची काही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.