मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या छातीवर SC/ST असे लिहिण्यात आले होते. अशा प्रकारे उमेदवारांच्या छातीवर जात लिहिण्याचा प्रकार हा देशाच्या छातीत सुरा भोसकणारा आहे, असा विखारी वार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपe आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ट्विटरच्या माध्यमातून केला.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, भाजप सरकारच्या जातियवादी भूमिकेतून करण्यात आलेला हा प्रकार म्हणजे देशाच्या छातीत सुरा भोसकणारा आहे. अशा प्रकारे तरूणांच्या छातीवर जातीचा उल्लेख करणे, हा एकप्रकारे देशाच्या संविधानावरील हल्ला आहे. ही भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आहे. हीच विचारधारा कधी दलितांच्या गळ्यात हंडी लटकवते, कधी शरीरावर झाडू बांधायला भाग पाडते, तर कधी मंदिरात जाण्यापासून अडवते. आपण या विचारधारेला पराभूत करू या, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
BJP सरकार के जातिवादी रवैये ने देश की छाती पर छूरा मारा है। MP के युवाओं के सीने पर SC/ST लिखकर देश के संविधान पर हमला किया है।
ये BJP/RSS की सोच है। यही सोच कभी दलितों के गले में हांडी टंगवाती थी, शरीर में झाडू बंधवाती थी, मंदिर में घुसने नहीं देती थी। हम इस सोच को हराएँगे। pic.twitter.com/ycqt1nEp0E
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 30, 2018
सध्या मध्य प्रदेशातील पोलीस भरतीत मैदानी चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांचाही समावेश आहे. या उमेदवारांची स्वतंत्र वर्गवारी करणे सोपे व्हावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाने उमेदवारांच्या छातीवर SC/ST असे लिहिले. या प्रकारावरून रुग्णालय प्रशासन आणि भाजपा सरकारवर प्रचंड टीका होत आहे.