पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानताना काँग्रेसवर टीकास़्त्र सोडले. सरकारी संस्थांना नष्ट करण्याच्या काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मोदींनी ‘उलटा चोर चौकीदार को डांटे’ असे म्हटले. तर त्यानंतर काही वेळाने काँग्रेस मुख्यालयातील बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर राफेल करारावरून गंभीर आरोप केले. पंतप्रधान मोदींनी संरक्षण करारात ३० हजार कोटी रूपयांची चोरी करण्यास मदत केली. त्यांनी ही सारी रक्कम अनिल अंबानी यांना दिल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांच्याबरोबर प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.

लोकसभेत मोदींनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारच्या ५५ वर्षांच्या कार्याची तुलना आपल्या सरकारच्या ५५ महिन्यांशी केली. काँग्रेसच्या शासनकाळातील वर्षे हे सत्ताभोग वाले होते. तर भाजपा सरकारचे सेवाभाववाले सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी दिवसभरात राहुल गांधींनी पंतप्रधानांवर तिखट शब्दांत टीका केली होती. मोदी हे डरपोक असून डोकलाम प्रकरणावेळी चीनसमोर ते हात जोडून उभे होते, असा आरोप केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, मी भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतो माझ्याशी फक्त दहा मिनिटे वाद घालून दाखवा. मला खात्री आहे डरपोक पंतप्रधान नरेंद्र मोदी पळून जातील. दिल्लीत झालेल्या अल्पसंख्याक परिषदेत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. राहुल गांधी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. हे दोघे स्वतःला देशाच्या वरचढ समजतात मात्र, देश यांच्यापेक्षा वरचढ आहे आणि येत्या तीन महिन्यात याचा प्रत्यय या दोघांनाही येणार आहे असाही टोला राहुल गांधींनी लगावला होता.