कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही आणलेल्या कायद्यांमुळे शेतकरी त्याचा शेतमाल देशात कुठेही जाऊन विकू शकतो. मला मोदींनी उत्तर द्यावं की शेतकरी विमानाने त्याचा शेतमाल विकण्यासाठी जाईल की रस्त्यावर शेतमाल विकेल? रस्त्यावर शेतमाल विकायचा असेल तर बिहारमध्ये रस्ते आहेत कुठे?” असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंजाबमध्ये मोदींचे पुतळे पंजाबमध्ये जाळले गेले त्यावरुनही टीका केली होती. संपूर्ण पंजाबमध्ये नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांचे पुतळे जाळले गेले कारण शेतकरी त्रस्त आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आता बिहारमध्ये झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा कृषी विधेयकांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मोदी खोटं बोलतात. आधी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे येऊन २ कोटी रोजगार देण्याबद्दल भाष्य केलं, तर लोक त्यांना हाकलून लावतील. आम्ही रोजगार देण्याची माहिती आहे. विकास करणं आम्हाला माहिती आहे. आमच्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती मी स्वीकारतो. आम्हाला खोटं बोलणं माहिती नाही. याबाबत आमची मोदींशी स्पर्धाच नाही असंही राहुल गांधी म्हणाले होते. आता शेतकरी कुठेही जाऊन त्याचा शेतमाल विकू शकतो असं म्हणाणाऱ्या मोदींना राहुल गांधींनी सुनावलं आहे.