काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागतात, मात्र लंडनमध्ये ज्या हॅकरने पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला त्याची सत्यता तपासून पहाणे महत्त्वाचे वाटत नाही असा खोचक टोला भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. कपिल सिब्बल त्या पत्रकार परिषदेला हजर असतात, अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? असा प्रश्नही रविशंकर प्रसाद यांनी विचारला.

काँग्रेसने आजच पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान शुटिंगमध्ये व्यग्र होते असा आरोप केला आहे. ज्याला भाजपाकडूनही उत्तरही देण्यात आलं आहे. अशात आता सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा उचलून रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. पुलवामा येथील हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे अवघा देश हळहळला. मात्र पुलवामा येथे हल्ला झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यग्र होते असा आरोप काँग्रेसने केला. मात्र काँग्रेसच्या आरोपांना आता अमित शाह यांच्यापाठोपाठ रविशंकर प्रसाद यांनीही टीका केली आहे.