राहुल गांधी यांची कबुली; बेरोजगारीतून वाढलेल्या नैराश्यामुळे ट्रम्प, मोदींना सत्ता

बेरोजगारीमुळे वाढलेल्या नैराश्यातून जगातील लोक नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्यांना निवडून देत आहेत, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला रोजगारनिर्मितीतील अपयशामुळे पराभव पत्करावा लागला, अशी कबुलीच त्यांनी दिली. राहुल गांधी हे दोन आठवडय़ांच्या अमेरिका दौऱ्यावर असून प्रिन्स्टन विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. रोजगारनिर्मितीत पंतप्रधान मोदी अपयशी ठरले असून भाजपच्या धोरणातून आदिवासी व वंचित लोक दूरच राहत आहेत, त्यातून अनेक समस्या निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले

ते म्हणाले, की रोजगार ही फार महत्त्वाची बाब आहे. मोदी यांचा उदय व अमेरिकेत ट्रम्प यांना मिळालेली सत्ता या दोन्हीत भारत व अमेरिकेत रोजगार निर्मिती झाली नाही हे कारण होते. अनेक तरुणांना नोक ऱ्याच नाहीत त्यामुळे त्यांचे भवितव्य अंधारात होते. त्यांना त्या वेदनेचा सल होता व त्यांनी मोदी, ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना पाठिंबा दिला. बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे हे कुणी मान्य करायला तयार नाही ही एक समस्या आहे.

ट्रम्प काय करीत आहेत हे मला माहिती नाही पण आमचे पंतप्रधान मोदी पुरेशी रोजगारनिर्मिती करण्यात अपयशी ठरले आहेत. अमेरिकेतील तज्ज्ञ, उद्योग धुरीण व इतर अनेक बैठकांत राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा मुद्दा मांडला. सध्या आम्ही पुरेशी रोजगारनिर्मिती करण्यात अपयशी आहोत. सरकार रोज केवळ ५०० रोजगार निर्माण करू शकते व त्यात अनेक बेरोजगार संधीपासून वंचितच आहेत, असे त्यांनी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात सांगितले होते.

प्रिन्स्टन येथे राहुल यांनी सांगितले, की ‘भारताला चीनशी बरोबरी करण्यासाठी बदलावे लागेल. त्यासाठी लोकांना रोजगार हवेत. बेरोजगार लोकांच्या रागामुळे आमचा पराभव झाला पण आता रोज ३० हजार रोजगार निर्माण होत नसल्याने तरुण मोदींवरही संतापले आहेत.  बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे. मोदी या प्रश्नावरून लक्ष विचलित करीत आहेत. आता तरुणांमध्ये मोदींविरोधात संताप आहे. तो आम्हाला जाणवतो आहे. रोजगारवाढ कशी करणार हे खरे आव्हान आहे. पहिल्यांदा ती समस्या मान्य केली पाहिजे नंतर सर्वानी एकत्र येऊन तो प्रश्न सोडवावा पण सध्या कोणीच तो प्रश्न आहे हे मान्य करीत नाही, हे दुर्दैव आहे. नवीन तंत्रज्ञान व आधुनिकीकरणामुळे रोजगार नष्ट होतात हे खरे नाही. फक्त ‘ब्लू कॉलर’ रोजगारांचे स्वरूप बदलणार आहे.’

राजकीय ध्रुवीकरणामुळे नुकसान

‘आमच्या देशात ध्रुवीकरणाचा प्रश्न आहे. अल्पसंख्याक व आदिवासी लोकांना भाजप सरकारची दूरदृष्टी जर काही असेलच, तर ती अनुभवण्यास मिळालेली नाही. २१ व्या शतकात तुम्ही काही लोकांना सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केलात तर अडचणीत येणार हे नक्की आहे. नवीन कल्पना, नवी दृष्टी त्यासाठी  हवी आहे. ध्रुवीकरणाचे राजकारण हे भारतापुढचे खरे आव्हान आहे. एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात लढवले जाते, अशी परिस्थिती आहे. भारतात १०० दशलक्ष आदिवासी लोक आहेत. त्यांना भाजपची धोरणे सुसह्य़ वाटत नाहीत. देशातील अनेक राज्यांना भाजपकडून लादली जाणारी धोरणे गळा घोटल्यासारखी वाटतात. अल्पसंख्याकांना या सगळ्यात कुठे स्थान आहे असे वाटत नाही. भारताने आपल्याच लोकांना अंतर दिले तर त्याचा फायदा शेजारी देश हिंसाचार पसरवण्यासाठी घेतात. सध्याच्या सरकारच्या धोरणातून लाखो लोक बाहेरच आहेत, ही फार भूषणावह बाब नाही. त्यातून अनेक गंभीर समस्या निर्माण होतील.’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.

.. तर देशाच्या प्रगतीसाठी धोरण

काँग्रेस पक्षाची धुरा दिल्यास मी पुढील दहा वर्षांत भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी नवीन दृष्टिकोनावर आधारित धोरणे तयार करीन, त्यात रोजगारनिर्मिती, शिक्षण, आरोग्य यावर भर असेल असे त्यांनी सूचित केले.