काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधानांवर घणाघाती टीका
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला. मोदी यांच्यात उथळपणा आहे आणि ते संघ परिवारासोबत विखारी प्रचार करीत असून निवडणुकीच्या काळात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात फूट पाडण्याचा त्यांचा उद्देश आहे, असा आरोप गांधी यांनी केला.
मोदींकडे कोणत्याही गोष्टीचे आकलन करून घेण्याचा अभाव आहे आणि आपल्या कल्पनांचा ते माध्यमांद्वारे गवगवा करण्याचा प्रयत्न करीत असतात, असा आरोपही गांधी यांनी केला आहे. मोदींची एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची इच्छा नसते केवळ घडामोडींवर आधारित राजकारण करणे त्यांना रुचते, असेही काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन मोदी यांनी नागा करार करीत असल्याची माहिती दिली. मात्र मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री त्याबद्दल अनभिज्ञ होते, असे उदाहरणही गांधी यांनी दिले. इतकेच नव्हे तर गृहमंत्र्यांनाही त्याची कल्पना नव्हती, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आपापसातील मतभेद गाडून विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाण्याचे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील काँग्रेसच्या नेत्यांना केले असतानाच पक्षाच्या नेत्यांनी मात्र पश्चिम बंगालमध्ये माकपशी हातमिळवणी न करण्याचे आवाहन गांधी यांना केले.
केरळ प्रदेश काँग्रेस समिती कार्यकारिणीच्या बैठकीत, माकपला दूर ठेवण्याची मागणी करण्यात आली. डावा पक्ष विश्वासार्ह नाही, त्यांचे राजकारण हिंसक आहे, असा आरोपही करण्यात आला.
राहुल गांधी यांनी भाषणात या मुद्दय़ाला स्पर्श केला नाही. मात्र केरळमधील नेत्यांनी आपापसातील मतभेद दूर ठेवण्याचा संदेश नेत्यांना दिला. ही वेळ आपापसात भांडण्याची नाही, निवडणुका एकत्रितपणे लढण्याची आहे, असे गांधी म्हणाले. मतभेदामुळे काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करू शकते, असेही ते म्हणाले. सत्ता मिळविण्यासाठी मतभेद दूर ठेऊन पक्षासाठी काम करणे हेच यशाचे सूत्र असल्याचे सांगत, गांधी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.