पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानावर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी टीकास्त्र सोडले. केवळ फोटो काढण्याची संधी मिळते, म्हणून देशात स्वच्छता अभियान राबविले जात असल्याची टीका त्यांनी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात केली.
पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, हा देश आपले घर आहे. देशात सध्या सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सगळे लोक हातात झाडू घेऊन रस्त्यावर दिसताहेत. फोटो काढण्याची संधी मिळते, म्हणून हे सगळे चालले आहे. मात्र, दुसरीकडे समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे कामही केले जात आहे. समाजातील सलोखा मिटवण्याचे काम केले जात आहे. आपल्याला समाजातील सलोख्याचे संबंध टिकवण्याचे काम पुढील काळात केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेसमध्ये प्रेम आणि बंधुत्त्वाची भावना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.