पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उद्या (शनिवारी) कोलकातामध्ये विरोधकांच्या भव्य सभेचे आयोजन केले आहे. यामुळे वर्षांच्या सुरुवातीलाच विरोधकांना आपली ताकद दाखवण्याची पहिली संधी मिळणार आहे. भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी सर्व विरोधक या सभेला हजर राहण्याची शक्यता आहे.

या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी माजी पंतप्रधान आणि जदयूचे प्रमुख एच. डी. दैवेगौडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे कोलकाता येथे पोहोचले आहेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते कुमारस्वामी आज रवाना होणार आहेत. द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन हे देखील या रॅलीला हजेरी लावणार आहेत. बसपाचे प्रतिनिधी म्हणून सतीश मिश्रा या रॅलीचा भाग होणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी या रॅलीत सहभागी होऊ शकणार नाहीत. मात्र, त्यांच्यावतीने मल्लिकार्जुन खर्गे आणि अभिषेक मनु सिंघवी यामध्ये सहभागी होणार आहेत.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून आपले समर्थन कळवले आहे. या पत्रात राहुल गांधींनी लिहीले की, सर्व विरोधक एकजूट झाले आहेत. ममता दीदींना माझे या सभेसाठी समर्थन आहे. तसेच या सभेतून आपण एकजुट भारताचा सक्षम संदेश देऊ अशी आशा करतो. सर्व विरोधक खरा राष्ट्रवाद आणि विकास, लोकशाहीचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता यासाठी एकत्र येत आहेत. या गोष्टी नरेंद्र मोदी सरकारने पार धुळीला मिळवल्या आहेत.

यावर उत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही सभा म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपासाठी मृत्युची घंटा आहे. भाजपाच्या कुशासनाविरोधात संयुक्त लढ्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. त्यासाठी कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदान येथे शनिवारी होणाऱ्या सभेमध्ये २०हून अधिक प्रमुख विरोधी पक्षांचे नेते हजेरी लावणार आहेत.

या सभेला बहुजन समाज पार्टीचे (बसपा) महासचिव सतीश चंद्र मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (राकांपा) प्रमुख शरद पवार, राष्ट्रीय लोक दलचे (रालोद) अजित सिंह, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी, पाटीदार नेता हार्दिक पटेल, दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि झारखंड विकास मोर्चाचे बाबूलाल मरांडी देखील ममतांसोबत व्यासपीठावर दिसणार आहेत. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जेगांग अपांग देखील या सभेला हजेरी लावणार आहेत. जेगांग यांनी मंगलवार भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.