काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हे कोणतेही ज्ञान नसतानादेखील स्वत:ला तज्ज्ञ समजतात. हीच त्यांची खरी समस्या आहे, अशी उपरोधिक टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. ललित मोदींप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर होत असलेले सर्व आरोप निराधार व खोटे असल्याचे ठोस प्रतिपादन जेटली यांनी लोकसभेत केले. पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीच्या पूर्वसंध्येला ललित मोदींप्रकरणी स्थगन प्रस्तावावर लोकसभेत चर्चा झाली. स्वराज यांनी ललित मोदींना केलेल्या मदतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने आज स्थगन प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. स्वराज यांचे स्पष्टीकरण व भाजपच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करीत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.
राहुल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढविला. ते म्हणाले की, या आरोपांचा सामना करण्याची क्षमता पंतप्रधानांमध्ये नाही. त्यामुळे ते अनुपस्थित आहेत.  राहुल म्हणाले की, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील  काळ्या पैशांचे ललित मोदी प्रतीक आहे. त्यांना स्वराज यांनी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मदत केली. त्यावर जेटली म्हणाले, खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या हाती डोंगर पोखरून उंदीर हाती आला आहे. २००९ साली आयपीएल क्रिकेट स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत घेताना भारतातील पैसा आरबीआयच्या परवानगीशिवाय परदेशात नेण्यात आला. तेव्हापासून सक्तवसुली संचालयनालय (ईडी) संबंधित व्यक्तीचा (ललित मोदी) शोध घेत आहे. त्या वेळी तत्कालीन सरकारने (ललित मोदींना) ताब्यात घेण्याऐवजी फेमाअंतर्गत लाइट ब्लू कॉर्नर नोटीस धाडली. हा मार्गच चुकीचा निवडण्यात आला.