राजकीय व्यासपीठावरुन बोलताना अनेकदा नेते भाषणाच्या आवेशात काहीही बोलून जातात. भाषण संपल्यावर अनेकदा नेत्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. काँग्रेसच्या अशाच एका नेत्याचा व्हिडिओ सध्या फेसबुकवर व्हायरल झाला आहे. यामध्ये भाषणाच्या आवेशात काँग्रेस नेत्याने राहुल गांधी यांना शहीद म्हटले आहे. फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत काँग्रेसचा एक नेता जनतेला संबोधित करताना दिसत आहे. ‘देशासाठी श्रीमती इंदिरा गांधी शहीद झाल्या. राहुलजी शहीद झाले आहे,’ असे या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेता बोलताना दिसतो आहे. यानंतर जनसभेत मागे बसलेली एक व्यक्ती राहुल गांधी अद्याप जिवंत असल्याचे भाषण करत असलेल्या नेत्याच्या लक्षात आणून दिले. या व्हिडिओतून भाषण करत असलेल्या नेत्याची नेमकी ओळख पटलेली नाही.

सुशांत सिन्हा नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘काँग्रेसच्या नेत्यांनाच राहुल गांधी जिवंत आहेत की नाही, माहित नाही,’ असे सुशांत सिन्हा यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे. १६ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. यासोबतच अनेकांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. लोकसत्ताने या व्हिडिओच्या सत्यता तपासलेली नाही.

याआधी वित्त विधेयकावरील संसदेतील चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांचा गोंधळ उडाला होता. त्यानेळी हुड्डा यांच्या तोंडून अदानीऐवजी भाजपचे वरिष्ठ नेते अडवाणी यांचे नाव निघाले होते. मात्र यानंतर हुड्डा यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपच्या धोरणांवर टीका करताना, भाजप केवळ अदानी आणि अंबानी यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप हुड्डा यांना करायचा होता. मात्र त्यावेळी चुकून त्यांच्या तोंडून अदानी यांच्या जागी अडवाणी यांचे नाव निघाले.