अहमदाबादहून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेल्या साणंदला जाण्यासाठी चौपदरी महामार्ग आहे. साणंदमध्येच महामार्गावर टाटा नॅनोचे प्रवेशद्वार आहे. वीरमगावला जात असलेल्या या महामार्गावरून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे फलक दिसतात. या रस्त्यावरून साणंद गावात जाण्यासाठी मात्र गल्लीवजा रस्त्यावरून जावे लागते. डांबरी रस्ता, शेजारी माती, पावसामुळे झालेला चिखल आणि चिखलात उभे राहून एसटीची वाट पाहणारे लोक हे देशातल्या इतर कोणत्याही गावाप्रमाणे दिसणारे दृश्य बाजाराच्या ठिकाणी आहे.

साणंद ओळखले जाते, ते गुजरातच्या विकासाचे प्रारूप म्हणून. आणि ते खरेही आहे. पश्चिम बंगालने नॅनोसाठी सिंगूरला दिलेली जागा परत मागितल्यावर गुजरातने त्यांना साणंद येथे बोलावले. २००८ मध्ये नॅनो आल्यावर गेल्या नऊ वर्षांमध्ये या परिसरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या. त्यासाठी गुजरात औद्योगिक विकास महामंडळामार्फत हजारो एकर जागा विकत घेण्यात आली. त्यामुळे जागांचे भावही चौपटीने वधारले. अनेक जण जमिनी विकून लखपती झाले. काहींनी दुसरीकडे मोठय़ा जमिनी विकत घेतल्या शिवाय कंपनीमध्ये नोकरी मिळाल्याने त्यांना उत्पन्नाचे आणखी एक साधन उपलब्ध झाले. स्थानिकांना दहा हजारांहून अधिक रोजगार मिळाले, असे साणंद तालुक्यातील भाजपचे अध्यक्ष के. एस. पटेल यांनी सांगितले. या गावात नर्मदेतील पाणी कालव्याने आणले गेले आहे. त्यामुळे शेतीही चांगली होते. साणंदमध्ये पूर्वी एकच बाजार होता. आता या परिसरात सहा बाजार उभे राहिले आहेत. हे विकासाचेच प्रतीक आहे, असे दुसऱ्या कार्यकर्त्यांने हिरिरीने सांगितले. साणंद गावच्या बाजारापासून दीड किलोमीटर अंतरावर काचेच्या पाच मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर भाजपचे प्रचार कार्यालय आहे.

साणंद गावच्या बाजारातच असलेल्या काँग्रेसच्या जुन्या कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण झाले. येथून निवडणूक प्रचाराचे काम पाहिले जाते. येथे काम करीत असलेले कार्यकर्ते मात्र विकासाची दुसरी बाजू सांगतात. या कंपन्यांना जागा देत असताना तिथे स्थानिकांना रोजगार मिळेल, असे सांगण्यात आले. टाटा नॅनो कंपनी आधी पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. त्यामुळे कंपनीने तिथे कर्मचारी भरले होते. ते कर्मचारी कमी करणार नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले आणि ते ठीकही आहे. मात्र इतर कंपन्यांनीही केवळ रोजगाराचे आमिष दाखवले आणि ते दिले नाही, असे काँग्रेसचे या विभागातील सरचिटणीस पंकजसिंह वाघेला यांनी सांगितले. आमची मुले शिकली तरी त्यांना कर्मचारी, अधिकारी पदाची कामे मिळत नाहीत. चहा देणे, सफाई करणे अशी चतुर्थश्रेणी कामे त्यांना मिळतात व काही दिवसांनी नोकरीवरून काढूनही टाकले जाते, असे आणखी एका काँग्रेस कर्मचाऱ्याने सांगितले.

२००८ मध्ये टाटा नॅनो उद्योग येऊनही २०१२ मध्ये साणंदने काँग्रेसच्या पारडय़ात विजय टाकला होता. त्यासाठी केवळ विकास किंवा रोजगार हा मुद्दा नव्हता. या भागात दोन लाख ४० हजार मतदार आहेत. त्यातील ६५ हजार कोळी पटेल आणि १८ हजार पाटीदार पटेल आहेत. ३५ हजार राजपूत, २८ हजार दलित, २० हजार मुस्लीम, १८ हजार ठाकूर आणि इतर आहेत. येथे लढतीत असणारे तीनही उमेदवारी कोळी पटेल समाजातील आहेत. २०१२ मध्ये इथून काँग्रेसच्या तिकिटावर करमसी पटेल निवडून आले होते. राज्यसभेच्या मतदानावेळी ते भाजपमध्ये गेले. आता त्यांचा मुलगा कानुभाई पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून या वेळी पुष्पाबेन धाबी िरगणात आहेत.

ल्ल गेल्या दहा वर्षांत विकास प्रारूप म्हणून पुढे आलेल्या या गावात भाजपचे पारडे जड असले तरी संपूर्ण गुजरातमध्ये काँग्रेस करीत असलेला प्रचार, राहुल गांधी यांनी विकास प्रारूपावर लावलेले प्रश्नचिन्ह, गुरुवारी त्यांची साणंदमध्ये होत असलेली त्यांची सभा आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जातीचा कौल यामुळे येथील निवडणूक चुरशीची होईल.