काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या दोन भाषणांमध्ये ९९ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाव घेतलं. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधींनी आपल्या अखेरच्या दोन भाषणांत, जी ६५ मिनिटं चालली त्यात तब्बल ९९ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी ज्याप्रकारे आक्रमकतेने भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत आहेत, ते पाहता त्यांनी आपल्या धोरणात बदल केलेला दिसत असल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. वर्षभरापूर्वी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचं थेट नाव न घेताच टीका करत होती. मात्र आता थेट त्यांच्या नावाचा उल्लेख करत हल्लाबोल केला जात आहे. २०१९ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने ज्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता, त्यांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी करण्याचा ठरवल्याचं दिसत आहे.

२३ एप्रिलला नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये संविधान वाचवा मोहिमेला सुरुवात करताना राहुल गांधींनी आपल्या ३० मिनिटांच्या भाषणात ४७ वेळा नरेंद्र मोदींचा उल्लेख करत भ्रष्टाचार, दलित, महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरुन टीका केली होती. जनआक्रोश रॅलीतही नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली. २९ एप्रिलला रामलीला मैदानावर झालेल्या या रॅलीत राहुल गांधींनी ३५ मिनिटं भाषण केलं. यावेळी त्यांनी ५२ वेळा नरेंद्र मोदींचा उल्लेख करत भ्रष्टाचार, डोकलाम, कठुआ आणि उन्नाव बलात्काराच्या घटनांवरुन लक्ष्य केलं.

काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, आता पक्ष नरेंद्र मोदींनाच जबाबदार ठरवत आहे, कारण ते पक्षाचे सर्वेसर्वा असून भाजपा पक्ष कुठेतरी हरवला जात आहे. रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे की, ‘देशातील प्रमुख विरोधी पक्षांना लोकांच्या समस्यांसाठी पुढे यावंच लागेल. भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवरुन सरकारचा पर्दाफाश केलाच पाहिजे. मोदी या सरकारचे सर्वेसर्वा आहेत आणि सरकारमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्यापासून सुरु होते आणि तिथेच संपते. यामुळेच अपयशासाठी त्यांना जबाबदाऱ ठरवलं पाहिजे’.