एकीकडे चीन-भारत सीमा संघर्ष अजूनही संपलेला नसताना देशात गलवान व्हॅलीतील संघर्षावरून भाजपा विरूद्ध काँग्रेस असं आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. सीमेवरील संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्यानं सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत. राहुल गांधींकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधी ते सर्व करत आहेत, जे जबाबदार विरोधी पक्षाच्या नेत्यानं करायला नको,” असं म्हणत नड्डा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर भारत-चीन सीमावादाचा प्रश्न ऐरणीवर आला. १५ जूनपासून या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असल्याचं दिसून येत आहे. मात्र, चर्चेतून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे गलवान व्हॅलीतील संघर्षात २० जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला सवाल केले होते. सातत्यानं राहुल गांधी यावरून सरकारवर टीका करत आहे. राहुल गांधी यांच्या टीकेचा भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाचार घेतला.

आणखी वाचा- करोना, जीएसटी आणि नोटबंदी; हॉवर्डमध्ये अपयशाची केस स्टडी म्हणून शिकवलं जाईल- राहुल गांधी

नड्डा यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. “राहुल गांधी संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या एकाही बैठकीत सहभागी झाले नाहीत. मात्र, वेदनादायी गोष्ट ही आहे की, ते सातत्यानं देशाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर लष्कराच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधी ते सगळ करत आहेत, जे एका जबाबदार विरोक्षी पक्षनेत्यानं करायला नको,” अशी टीका नड्डा यांनी केली आहे.

“राहुल गांधी अशा वंशपरंपरेतून येतात, जिथे संरक्षणा संबंधित समित्यांचं काही स्थान नाही. फक्त आयोग चालतात. काँग्रेसमध्ये असे अनेक पात्रता असलेले नेते आहेत, ज्यांना संसदीय विषयांचं महत्त्व माहिती आहे, पण एक घराणे अशा नेत्यांना मोठं होऊ देणार नाही. हे खरोखर दुःखद आहे,” असा हल्लाबोल नड्डा यांनी ट्विट करून काँग्रेसवर केला.

आणखी वाचा- ठरलं! भाजपाच्या ‘या’ नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर ते आक्रमकपणे प्रश्न विचारताना दिसले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लडाखमधील लोकांचा व्हिडीओ शेअर केला होता. तसेच लोक किंवा पंतप्रधान दोघांपैकी कुणीतरी एक खोटं बोलत आहे, असा आरोप केला होता.