News Flash

संघावरून पुन्हा राहुल-भाजप वाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ‘मुस्लिम ब्रदरहूड’शी केल्याने टीकेचे मोहोळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केल्याने टीकेचे मोहोळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ‘मुस्लिम ब्रदरहूड’सारखीच अतिरेकी विचारांची संघटना असून त्यांना भारताचे मूळ स्वरूपच बदलायचे आहे. त्यासाठी देशातील स्वायत्त संस्थावर ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी जहरी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लंडन दौऱ्यात केली. त्यांच्या या टीकेवर भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली असून गांधी हे देशाची प्रतिमा मलीन करीत असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी हे जर्मनीचा दौरा आटोपून लंडनमध्ये आले आहेत. तिथे विविध कार्यक्रमात त्यांनी संघ आणि भाजपला लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. लंडनमधील ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज’मधील कार्यक्रमात ते म्हणाले की, ‘‘याआधी सत्तेवर आलेल्या नेत्यांनी कधीही देशातील घटनात्मक संस्थांना बटिक बनवण्याचा प्रयत्न केला नाही. सध्या मात्र तसा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच संघाने नोटाबंदीसारखा निर्णय सरकारला घ्यायला लावला. अर्थमंत्रालय, रिझव्‍‌र्ह बँक यांना डावलून तो निर्णय घेतला गेला.’’

जर्मनीत आपण जे बोललो त्यावर भाजपने अनाठायी टीका केली आहे, असा दावा करीत ते म्हणाले की. बेकारीमुळे दहशतवादी संघटनांकडे तरुण वळत आहेत, असे आपण म्हणालो नव्हतो. तर इथल्या तरुणांना जर रोजगार मिळवून दिला नाही आणि राष्ट्रउभारणीच्या संकल्पनेत त्यांनाही सहभागी करून घेतले नाही, तर घातक संकल्पनांकडे त्यांना वळवण्यात दहशतवादी गटांना यश येऊ शकते, असे आपण म्हणालो होतो. पण माझ्या बोलण्याचा विपर्यास करून सतत टीका करण्याची सवयच भाजपला लागली आहे. त्यांच्याविरुद्ध बोलणे म्हणजे देशाविरुद्ध बोलणे, हे त्यांचे सूत्र झाले आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली.

पाकिस्तानबाबत भाजपचे धोरणच धरसोडीचे आहे, अशी टीका करीत राहुल म्हणाले की, ‘‘पाकिस्तानशी चर्चा व्हावी, अशी भारताची पूर्वापार इच्छा आहे. पण चर्चा नेमकी कोणाशी करायची, हा प्रश्न कायम आहे. पाकिस्तानने प्रथम आपल्या घटनात्मक संस्थांना खऱ्या अर्थाने पत मिळवून दिली तर त्यांच्याशी चर्चा करता येईल.’’

चीनचे सैन्य डोकलाममध्ये आजही आहे, असा आरोप करीत गांधी म्हणाले की, ‘‘कोणत्याही गोष्टीचा ‘इव्हेन्ट’ करण्याची सवय सरकारला जडली आहे. चीनबाबतच्या संबंधांतही तेच झाले. डोकलाम ही अनेक गोष्टींची परिणती आहे. त्या सर्वच गोष्टींवर नजर ठेवली असती तर चीनला अधिक्षेप करण्याची संधीच मिळाली नसती.’’

भाजप संतप्त

राहुल यांनी संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केल्याने भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षप्रवक्ते संबीत पात्रा म्हणाले की, ‘‘भारताविषयीचे राहुल गांधी यांचे आकलनच त्यांच्या नेतृत्वाइतकेच अपरिपक्व आहे. लोकांनी निवडून दिलेला भाजप ही अतिरेकी संघटना आहे, असे राहुल यांना म्हणायचे आहे का? त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. केवळ पंतप्रधान मोदी आणि भाजपविरुद्ध द्वेष आहे.’’

पात्रा राहुल यांना उद्देशून म्हणाले की, ‘‘ही तुमची व्यक्तिगत सहल नाही. तुमच्याकडे एक जबाबदार नेते म्हणून बाहेरचे देश पाहात आहेत. जग तुम्हाला त्याच दृष्टीने ऐकत आहे. अशा वेळी भारताविरोधात सुपारी घेतल्याप्रमाणे तुम्ही टीका करणे हे शोभणारे नाही.’’

मानद वक्त्याचा मान!

ब्रिटन पार्लमेंटच्या ‘ग्रॅण्ड कमिटी रूम’समोरही राहुल गांधी यांचे शुक्रवारी भाषण झाले. ब्रिटनच्या सर्व खासदारांसमोर या व्यासपीठावर भाषण करणारे ते पहिले भारतीय विरोधी पक्षनेते ठरले. याआधी या व्यासपीठावर नेल्सन मंडेला (मे १९९३), मिखाइल गोर्बाचोव्ह (डिसेंबर १९९३) आणि दलाई लामा (जुलै १९९६) हे मानद वक्ते म्हणून आमंत्रित होते. महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि प्रेम या तत्त्वांच्या आधारेच जगाला वाटचाल करावी लागेल, यावर गांधी यांनी आपल्या भाषणात भर दिला. ब्रिटनने एकेकाळी आमच्यावर राज्य केले, पण आता ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांचे वजन वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 12:56 am

Web Title: rahul gandhi on rss
Next Stories
1 आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक 12 मध्ये होणार मल्ल्याची रवानगी, सीबीआयने न्यायालयात सादर केला व्हिडीओ
2 राहुल गांधी यांनी अदिति सिंह यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
3 प्रणव मुखर्जींनंतर रतन टाटा संघाच्या कार्यक्रमात झाले सहभागी
Just Now!
X