हाथरस दुर्घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी चालत निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राहुल गांधी पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या तयारीत आहेत.


काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत हथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली आहे. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल,” असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

आणखी वाचा- हाथरस पीडितेच्या गावात ३०० पोलिसांची फौज, दोन दिवस कुटुंबाला केलं ‘कैद’; फोन टॅपिंगचा संशय

हाथरसमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जमावबंदी करण्यात आली आहे. तसंच सीमेवर बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगण्यात आलं. याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- “पीडितेच्या कुटुंबीयांना भयंकर त्रास कुणाच्या आदेशावर देण्यात आला?”; प्रियंकांनी केली राजीनाम्याची मागणी

काँग्रेस नेता के. सी. वेणुगोपाल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हथरसकडे रवाना होणार आहे. राहुल गांधी हथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. दरम्यान, प्रसार माध्यमांना हथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.