राहुल गांधी यांची आसाममध्ये टीका

संसदेत गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा मोदी यांना लक्ष्य केले. काही मोजके बडे उद्योगपती आणि ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्या हिताचे मोदी रक्षण करतात आणि नोकरदारांच्या आयुष्यभराच्या बचतीवर कर लावतात, असा हल्ला गांधी यांनी चढविला.

आसाममध्ये एका जाहीर सभेत भाषण करताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, मोदी यांनी आपल्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेने आपण बिथरलेलो नाही. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर कर आकारण्याचा निर्णय मागे घेण्यात येईपर्यंत सरकारवर दबाव आणणार असल्याचा निर्धार गांधी यांनी या वेळी व्यक्त केला.

केंद्रीय अर्थसंकल्पातील फेअर अ‍ॅण्ड लव्हली योजनेद्वारे मोदी यांनी शर्विलकांना आपला काळा पैसा पांढरा करण्याची अनुमती दिली, मात्र प्रामाणिक नोकरदारांच्या आयुष्यभराच्या बचतीवर कर लादला. नोकरदारवर्गाच्या प्रामाणिक बचतीवर कर लावण्यात येऊ नये, असे आपण मोदींना सांगितले. मात्र मोदी यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात त्या मुद्दय़ाला स्पर्शही केला नाही, असेही गांधी म्हणाले.

याबाबत आपण सरकारवर सातत्याने दबाव टाकणार आहोत, कारण हे सरकार गरीब शेतकरी, मागासवर्गीय, युवक, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे नाही, असेही ते म्हणाले.