काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘मनरेगा’वरून काँग्रेसवर केलेल्या टीकेचा हवाला देत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “मनरेगाशिवाय गरिबी संपणार नाही, पण गरीब संपेल”, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी वाढती बेरोजगारी व मनरेगा संदर्भातील एक फोटो ट्विट केला आहे. मनरेगा व घसरत चाललेल्या रोजगारांच्या आलेख शेअर करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदी म्हणाले होते की, मनरेगामध्ये लोकांकडून फक्त खड्डे खोदून घेतले जातात. पण, सत्य हे आहे की, मोदीजींनी आर्थिक खड्डा खोदला असून, यातून गरिबांना बाहेर काढण्याचं काम मनरेगा आज करत आहे. मनरेगाशिवाय गरिबी नाही, तर गरीब संपेल,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

करोना व लॉकडाउनमुळे देशात आर्थिक आघाडीवर अनेक प्रश्न निर्माण झाले असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारवर सातत्यानं टीका केली जात आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लॉकडाउनच्या निर्णयासह करोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी गरिबांच्या खात्यावर ७५०० रुपये थेट मदत देण्याची मागणी केली होती.