उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथील दोन भाऊ आयआयटी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले असले तरी त्यांची आर्थिक स्थिती वाईट असल्याने ते प्रवेश घेऊ शकत नाहीत, याचे वृत्त प्रसिद्ध होताच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या दोघा भावांना मदत देण्याचे आश्वासन फोनवर दिले आहे.समाजाच्या विविध स्तरातूनही या विद्यार्थ्यांना मदत दिली जात आहे. दरम्यान मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांनी या दोघांची फी माफ केली आहे. त्यांना नोंदणी शुल्क द्यावे लागणार नाही. शिक्षण खर्च, भोजनाचा खर्च यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे असे त्यांनी ट्विटरवर जाहीर केले.
राजू (१८) व ब्रिजेश (१९) अशी या दोन भावांची नावे असून त्यांचे वडील रोजंदारी कामगार आहेत. दोन्ही भाऊ आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. गांधी यांनी ट्विटरवर त्यांचे अभिनंदन केले असून त्यांनी म्हटले आहे की, आपण सकाळीच या मुलांच्या कुटुंबीयांशी बोललो आहोत. स्थानिक पक्ष नेते व राज्यसभेचे खासदार प्रमोद तिवारी व त्यांची आमदार कन्या आराधना यांना त्यांना मदत देण्यास सांगितले आहे.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, जवाहर नवोदय विद्यालयांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगतीचा नवा मार्ग दाखवला आहे. राजू व ब्रिजेश यांचे शिक्षण प्रतापगडच्या नवोदय विद्यालयात झाले आहे. मुलांच्या प्रवेशाचे शुल्क भरण्यास त्यांचे वडील धरमराज सरोज यांना १ लाख रुपयांची गरज होती. राहुल गांधींना ही बाब समजताच त्यांनी थेट या दोन भावांना फोन केला व त्यांची समस्या ऐकून तिवारी व त्यांच्या मुलीला त्यांना मदत करण्याचे आदेश दिले. एनएसयूआय ही काँग्रेसची विद्यार्थी संघटनाही त्या दोघांसाठी पैसे गोळा करणार असून २५ जूनपर्यंत त्यांचे शुल्क भरले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2015 रोजी प्रकाशित
राहुल-इराणी यांच्यात रस्सीखेच
उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथील दोन भाऊ आयआयटी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले असले तरी त्यांची आर्थिक स्थिती वाईट असल्याने ते प्रवेश घेऊ शकत नाहीत

First published on: 21-06-2015 at 12:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi vs smriti irani