लोकसभेत आज केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला गेला. त्यानंतर चर्चा सुरु झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोलण्यास उभे राहिले आणि अत्यंत आक्रमक शैलीत त्यांनी राफेल करार, महिला अत्याचार, जमावाकडून होणारी मारहाण आणि हत्या या आणि अशा इतर मुद्द्यांवर मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले. या भाषणानंतर राहुल गांधी यांनी केलेली कृती ही आजवर लोकसभेच्या इतिहासातील दुर्मीळ असा क्षण होता असेच म्हणता येईल. राहुल गांधी भाषण संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ गेले. त्यांना असे चालत येताना पाहून मोदीही चकित झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाऊन राहुल गांधी यांनी त्यांची गळाभेट घेतली. विरोधी पक्षाच्या अध्यक्षाने पंतप्रधानांना येऊन भेटण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.

हाच लोकसभेतला तो दुर्मीळ क्षण

राहुल गांधी यांना पप्पू असे उपहासाने संबोधले जाते. त्याचाही उल्लेख राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केला. मला भाजपा आणि संघाचे लोक पप्पू समजतात हे मला ठाऊक आहे मात्र माझ्या मनात त्यांच्याविषयी तिरस्कार नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मात्र आजचे राहुल गांधी यांचे लोकसभेतले भाषण हा चर्चेचा विषय ठरला. जेवढे भाषण चर्चेत आले तेवढीच स्मरणात राहिली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत घेतलेली गळाभेटही. त्यामुळे हा क्षण हा संसदेतला दुर्मीळ क्षण ठरला असेच म्हणता येईल.