विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये सध्या राजकीय चिखलफेक सुरु असून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्ष आपली सर्व प्रकारची ताकद आजमावत आहेत. दरम्यान, राहुल गांधींचा कर्नाटकात सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी जिथे प्रचारासाठी जातात काँग्रेसचा तिथे पराभव होतो, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.


राहुल गांधी सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर असून तेथे ते विविध मंदिरांना भेटी देत आहेत. तसेच जाहीर सभाही घेत आहेत. सध्या कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असून भाजपनेही येथे सत्तांतरासाठी जोर लावला आहे. प्रकाश जावडेकरही सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. जावडेकर म्हणाले, राहुल गांधींचे आम्ही येथे स्वागत करतो. आम्ही त्यांचे स्वागत यासाठी करतो आहोत कारण ते ज्या ठिकाणी निवडणूक प्रचारासाठी जातात त्याठिकाणी काँग्रेसला हार पत्करावी लागते आणि भाजपला विजय मिळतो.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या मंदिर दर्शनावरुन जावडेकर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये सध्या मंदिर दर्शनाचे वारे शिरले आहे. काँग्रेसच्या जाहिराती देखील भगव्या होत आहेत. काँग्रेसवाले पहिल्यांदा पूर्ण धर्मनिरपेक्षवादी होते, आता ते हिंदू झाले आहेत. राहुल गांधींच्या मंदिर भेटी हा निवडणूकीसाठीची नौटंकी असल्याचे लोकांनाही माहिती असल्याचा टोला त्यांनी लगावला.