वादळ-वाऱ्यामुळे ताजमहाल या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मुख्य मकबऱ्यातील संगमरवरी रेलिंग तुटलं असून त्याच्या जाळ्याही पडल्या आहेत.

भारतीय पुरातत्व विभागाने शनिवारी याबाबत माहिती दिली. वादळी वाऱ्यामुळे मुख्य मकबऱ्यातील संगमरवरी रेलिंग तुटलं असून त्याच्या जाळ्या पडल्या आहेत. ताजमहाल परिसरातील झाडेही कोलमडून पडली आहेत. तसंच परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी बनवलेल्या शेडचं फॉल्स सीलिंगही निखळून पडलं आहे. ताजमहालशिवाय महताब बागच्या भिंतीवर झाड पडलंय, तर मरियम मकबऱ्यातही झाड पडल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

आग्रा आणि जवळील परिसरात जवळपास 100 किमी प्रति तास वेगानं आलेल्या वादळामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचंही समजतंय. तसंच 25 जण जखमी झालेत. विशेष म्हणजे करोना लॉकडाउनमुळे ताजमहाल गेल्या 68 दिवसांपासून बंद आहे. इतक्या दीर्घकाळ ताजमहाल बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, वादळामुळे आग्रा आणि जवळील परिसरात अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडले असून काही घरांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.