बंगळुरूला जाणाऱ्या मुजफ्फरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसचे ११ डबे बुधवारी पहाटे तामिळनाडूतील आराक्कोणमपासून ९० किलोमीटर अंतरावरील सिथेरी गावालगत घसरून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर ३३ जखमी झाले. अनधिकृत सूत्रांनुसार जखमींची संख्या ५० असून त्यातील सहाजणांची प्रकृती चिंताजनक आहे.या अपघाताचे कारण समजलेले नाही. पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी हा अपघात झाला तेव्हा बरेच प्रवासी निद्राधीन होते.
या अपघातामुळे ११ गाडय़ा रद्द कराव्या लागल्या, तीन गाडय़ांचा प्रवास खंडित झाला, चार गाडय़ांचे मार्ग बदलावे लागले तर पाच गाडय़ांच्या प्रवासाच्या वेळेत बदल झाला. अपघातग्रस्त गाडीतील २०० प्रवाशांनी गुवाहाटी एक्स्प्रेसद्वारे बंगळुरूपर्यंतचा प्रवास केला.
अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांचे तर किरकोळ जखमींना दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान रेल्वे राज्यमंत्री के. जे. सूर्यप्रकाश रेड्डी यांनी जाहीर केले आहे. अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी चेन्नईला धाव घेतली.