मुसळधार पावसामुळे बैठय़ा घरांवर एक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा महिला आणि दोन मुलांसह एकूण १७ जण झोपेतच ठार झाल्याची घटना सोमवारी येथून जवळच असलेल्या नादूर गावात घडली, असे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूला मुसळधार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे एक खासगी कुंपणाची भिंत बैठय़ा घरांवर कोसळली आणि त्याखाली घरातील लोक जिवंत गाडले गेले. या घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन यंत्रणा आणि मदतकार्य सेवेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले, असे पोलिसांनी सांगितले.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य आपत्कालीन मदतनिधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी के. राजमणी आणि पोलीस अधीक्षक सुजितकुमार यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.

गावकऱ्यांनी या भिंतीबाबत आपल्याला माहिती दिली होती. ही भिंत बेकायदेशीर असल्यास ती पाडण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात येईल आणि राज्य सरकारला सविस्तर अहवाल पाठविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, तमिळनाडूमध्ये २९ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत २५ बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत एक हजार जणांना तुतिकोरीन, कड्डलोर आणि तिरुनेलवेली जिल्ह्य़ातील मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. चेन्नई आणि जवळच्या चेंगलेपेठ येथील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जलाशयांमधील पाण्याच्या पातळीमध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्याने त्यांचा आढावाही घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.