यंदाच्या वर्षी भारतात मोसमी पावसाचा  (मान्सून) मुक्काम लांबल्याने त्याचा परिणाम म्हणून ऑस्ट्रेलियात वणवे पेटले, असे मत मेलबर्न विद्यापीठातील वणवेविषयक तज्ज्ञ  ट्रेनट पेनहॅम यांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत या वणव्यांमध्ये तीन जण ठार तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

पेनहॅम  यांच्या मते ऑस्ट्रेलियातील वणवे हे भारतातील मोसमी पाऊस लांबल्याने सुरू झाले असण्याची शक्यता आहे. ‘जगातील हवामान व्यवस्था या एकमेकांशी निगडित आहेत त्या आपण एकमेकांपासून तोडू शकत नाही. तुम्ही १० हजार किलोमीटर दूरवरच्या प्रदेशात बसलेला असलात तरी तुमच्या भागातील हवामानाचा परिणाम दूरस्थ ठिकाणी होऊ शकतो  पण याची कल्पनाही कुणी करू शकत नाही पण प्रत्यक्षात तसे घडत असते.’,  असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, ‘ भारतात यंदा मोसमी पाऊस विक्रमी झाला व तो बराच लांबला. गेल्या महिन्याच्या मध्यावधीपर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. आशियातील नैऋत्य मोसमी पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान चालतो व नंतर मोसमी वारे तेथून दक्षिणेकडे वळतात. पण भारतात मोसमी पाऊस लांबल्याने डार्विन शहरात पावसास विलंब होऊन पूर्व किनारा कोरडा पडला त्यामुळे तो वणवेप्रवण भाग बनला.’

सध्या न्यू साऊथ वेल्स येथे अभूतपूर्व वणवे लागले असून तीन लोक ठार तर १५० घरे जळून गेली आहेत. हजारो लोक यात विस्थापित झाले आहेत.

पेनहॅम यांनी सांगितले की, ‘ऑस्ट्रेलियात या वेळपर्यंत पाऊस येत असतो पण तो आला नाही कारण यावेळी  जागतिक हवामानाचा परिणाम झालेला आहे.  पावसाअभावी हा भाग कोरडा पडला असून उष्णता वाढून वारे वाहत असल्याने वणवे पेटले आहेत.’

वणव्यांमुळे ८५०००० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून लोकांना वणव्याचे प्रदेश टाळण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी तेथे आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

ब्लू माउंटन, सेंट्रल कोस्टसह सिडनी भागात  प्रथमच वणव्यांची धोकापातळी गेल्या दहा वर्षांत प्रथमच खूप जास्त आहे. प्रादेशिक अग्निशमन सेवेचे अँथनी क्लार्क यांनी सांगितले की, वणव्यांमुळे आगामी काळात भीषण स्थिती असेल यात शंका नाही.