भारतीय उद्योजक रजत गुप्ता हे मायदेशी पलायन करण्याची शक्यता गृहीत धरून त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी येथील सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली आहे.
वॉल स्ट्रीट शेअर बाजारात इनसायडर घोटाळा केल्याप्रकरणी ६३ वर्षीय गुप्ता यांना प्राथमिक न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास सुनावला असून आठ जानेवारीला त्यांना अटक होणार आहे. मात्र या निर्णयाला गुप्ता यांनी सेकंड सर्किट कोर्टात आव्हान दिले असून या निर्णयाला स्थगिती द्यावी व जामिनावर मुक्त राहाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. सरकारी वकिलांनी मात्र गुप्ता यांच्या या याचिकेस कडाडून विरोध केला आहे. भारतात गुप्ता यांचा मोठा परिवार, मित्रमंडळी व मालमत्ता असल्याने अटकेची परिस्थिती निर्माण झाल्यास ते मायदेशी पलायन करण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून त्यांचा हा अर्ज फेटाळावा, असे वकिलांनी म्हटले आहे. गुप्ता यांच्या पलायनाची शक्यता गृहीत धरूनच त्यांना एक कोटी अमेरिकी डॉलरचा बाँड लिहून देण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे, याकडे या वकिलांनी लक्ष वेधले.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास आठ जानेवारीला अटक झाल्यानंतर गुप्ता यांचे पारपत्रही सरकारदरबारी जमा होणार आहे.