राजस्थानमध्ये मंत्रालयातील चतुर्थ श्रेणीच्या १८ पदांसाठी आलेले अर्ज पाहून सध्या अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या १८ पदांसाठी १२, ४५३ उमेदवारांनी अर्ज केले होते. या अर्जदारांमध्ये १२९ अभियंते, २३ वकील, सनदी लेखापाल आणि कला शाखेतील ३९३ पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, यापैकी एक उमेदवार सध्या राजस्थानमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

शिपायांसाठीची ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम १८ जणांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या रामकृष्ण मीना याचा समावेश आहे. रामकृष्ण मीना हा जमवा रामगढ येथील आमदार जगदीश मीना यांचा मुलगा आहे. एका आमदाराच्या मुलाला मंत्रालयात शिपायाची नोकरी मिळाल्यामुळे साहजिकच विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. अंतिम १८ जणांच्या यादीत रामकृष्ण मीना हा १२ व्या स्थानावर आहे. मात्र, इतर सुशिक्षित उमेदवारांना डावलून त्याला नोकरी कशी काय देण्यात आली, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.

त्यामुळे चतुर्थ श्रेणीच्या संपूर्ण भरती प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली आहे. सध्याच्या सरकराच्या धोरणांमुळेच राज्यात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्या नातेवाईकांसाठी वशिला लावत आहेत, असे पायलट यांनी म्हटले.

मात्र, आमदार जगदीश मीना यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या पदाचा वापर करून मी मुलाला नोकरी मिळवून दिली, असा आरोप विरोधक करतात. मात्र, खरंच मला असे करता आले असते तर तर मी त्याला शिपयाची नोकरी कशाला मिळवून दिली असती? मी त्याला आणखी चांगली नोकरी मिळवून दिली नसती का?, असा सवाल त्यांनी विचारला. शिपाई पदाच्या १८ जागांसाठी एकूण १२, ४५३ लोकांनी मुलाखती दिल्या. यापैकी ३६०० जण उच्चशिक्षित होते. तर उर्वरित उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता पूर्ण केली होती. या पदासाठी उमेदवाराने पाचवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक होते.