बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या मुलाने भूतबाधेमुळे सरकारी बंगला खाली केल्याचे समोर असतानाच राजस्थानमधील आमदारांनाही आता चक्क भूताचा धसका घेतला आहे. पण भूतबाधा सरकारी निवासस्थानाला झाली नसून राज्याच्या विधानसभेलाच झाली आहे, असे या आमदारांचे म्हणणे आहे. काही आमदारांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेऊन भूतबाधेची शक्यता बोलून दाखवली आहे. यावर कळस म्हणजे गुरुवारी विधानसभेच्या आवारात तंत्रविद्येची माहिती एक पुजारी पूजाअर्चना करताना दिसला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावर काही सामाजिक संघटनांनी आता नाराजी व्यक्त केली आहे.

राजस्थानमधील भाजपा आमदार कल्याणसिंह चौधरी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. ते प्रदीर्घ काळापासून आजारी होते. यानंतर राजस्थानच्या विधीमंडळ परिसरातील ‘भूत’ पुन्हा एकदा बाटलीबाहेर आले. आमदारांमध्ये पुन्हा एकदा भूतबाधेची चर्चा सुरु झाली. ‘विधानसभेत २०० आमदार असून नवीन वास्तूत आजवर एकाही अधिवेशनात सर्वच्या सर्व आमदार कधीच उपस्थित राहू शकले नाही. कधी आमदाराचे निधन झाले तर कधी एखादा आमदार तुरुंगात होता, याकडे आमदारांनी लक्ष वेधले.

राजस्थानमधील विधीमंडळ सवाई मानसिंग स्टेडियमजवळील १७ एकर जागेवर बांधण्यात आले आहे. १९९४ ते २००१ या कालावधीत विधीमंडळाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यापूर्वी विधीमंडळाचे कामकाज शहरातील सवाई मानसिंग टाऊन हॉलमध्ये व्हायचे. नवीन विधीमंडळापासून काही अंतरावर स्मशानभूमी आहे.

भाजपा आमदार नागौर हबिबूर रहमान यांनी सांगितले की, नवीन विधीमंडळाच्या जागेवर अगोदर स्मशानभूमी होती. या ठिकाणी पूर्वी लहान मुलांच्या पार्थिवाला दफन करण्यात आले होते. अशा ठिकाणी आत्मा फिरत असतातच, असे त्यांनी नमूद केले. तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांनी नवीन इमारतीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. या जागेवर आधी स्मशानभूमी होती. त्यामुळे या परिसरात एखाद मंदिर बांधण्याची शिफारसही करण्यात आली होती, असेही सांगितले जाते.

पाच वेळा आमदार राहिलेले रहमान पुढे म्हणतात, वसुंधरा राजे यांनी बुधवारी आम्हाला आमदारांच्या निधनाबाबत विचारणा केली. हे असे अचानक मृत्यू का होत आहे असा त्यांचा प्रश्न होता. मी त्यांना या ठिकाणी एखादे यज्ञ करावे किंवा मौलानाकडून वास्तूचे शुद्धीकरण करावे, असे सांगितले. एखाद्या चुकीच्या जागेवर तुम्ही वास्तू बांधली तर त्या जागेवर पूजाअर्चना करुन वाईट आत्मांना लांब ठेवता येते, अशी सर्वांचीच धारणा असल्याचे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. गुरुवारी विधानसभेच्या आवारात एक पूजारी पूजा अर्चना करताना दिसल्याचे वृत्ता टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

राजस्थानमधील आमदार का घाबरलेत?
कल्याणसिंह चौधरी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. तर गेल्या वर्षी मंडलगडच्या आमदार किर्ती कुमारी यांचे निधन झाले होते. त्यापूर्वी बसपा आमदार बी एल कुशवाह यांना हत्येप्रकरणी तुरुंगवास झाला. गेल्या विधानसभेत काँग्रेस आमदार महिपाल मदेरना, मलखानसिंह बिश्नोई, बाबू लाल नगर यांना हत्या व बलात्काराच्या आरोपांमध्ये तुरुंगवास झाला होता.