राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हाती घेऊन अशोक गेहलोत सरकारवर अस्थिरतेचं संकट निर्माण करणाऱ्या सचिन पायलट यांनी काँग्रेस आमदार गिरीराज सिंह मलिंगा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गिरीराज यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले असून भाजपात प्रवेश कऱण्यासाठी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. गिरीराज यांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत खोटे आरोप केल्याप्रकरणी सचिन पायलट यांनी ही नोटीस पाठवली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सोमवारी काँग्रेस आमदार गिरीराज मलिंगा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की, “माझी सचिन पायलट यांच्याशी चर्चा झाली. ते माझ्याशी बोलले आणि किती पैसे हवे आहेत अशी विचारणा केली. त्यांनी मला ३५ कोटींची ऑफर दिली. हे डिसेंबरपासून सुरु असून यात काही नवीन नाही. मला हे शक्य नाही असं स्पष्ट सांगितलं आहे”. सचिन पायलट आणि आपलं दोन ते तीन वेळा बोलणं झालं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

दरम्यान सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतच्या नोटीशीवर २४ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये अशी विनंती न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना केली. या प्रकरणी शुक्रवारीच निर्णय देणार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी बैठकांचं सत्र सुरुच ठेवलं आहे. गेहलोत यांच्यासह ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. राजस्थानमधील सत्तापेचानंतरची काँग्रेस विधिमंडळ पक्षाची ही तिसरी बैठक होती.