पाकिस्तान आणि बांग्लादेशसोबत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्याचा भारताचा विचार आहे असे गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. मध्यप्रदेश येथील टेकनपूर येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स( बीएसएफ)च्या असिस्टंट कमांडंटच्या दीक्षांत समारोहात ते बोलत होते. पाकिस्तान आणि बांग्लादेशसोबत असलेल्या आपल्या सीमा बंद करण्याचा आमचा विचार आहे असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. दहशतवादाविरोधात हे भारताने उचललेले मोठे पाऊल ठरेल असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

तसेच बांग्लादेशमधून येणाऱ्या निर्वासितांचाही प्रश्न सुटेल असे ते म्हणाले. गृह खात्यातील सचिव, बॉर्डर सेक्युरिटी फोर्सेसचे अधिकारी, राज्यांचे मुख्य सचिव यांना याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. या सीमा सील करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते तांत्रिक सहाय्य सचिवांना करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. सीमेवरील वागणुकीचे नियम बीएसएफने बदलले आहेत. त्यामुळेच बीएसएफचा दरारा शेजारील राज्यामध्ये वाढला आहे असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये बीएसएफ जवानांच्या तक्रारी वाढत आहेत.

या तक्रारींचे निवारण करण्यासाठी परिणामकारक प्रणाली तयार करण्यात येईल असे ते म्हणाले. अत्यंत कठीण परिस्थितीतही बीएसएफचे जवान आपले मनोबल टिकवून काम करतात ही बाब प्रशंसनीय आहे असे राजनाथ सिंह म्हणाले. बीएसएफच्या जवानांचे पराक्रम हे अवर्णनीय आहेत असे ते म्हणाले. त्यांच्या पराक्रमाची चर्चा भारतातील काना-कोपऱ्यात होते. त्यांच्या बद्दल काढले गेलेले गौरवोद्गार ऐकून छाती अभिमानाने फुलून येते असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.