सूतगिरणीच्या उद्योगातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उडी घेत तब्बल सात हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाळे विणणारे आणि त्या जाळ्यात स्वत:च गुरफटल्याने स्वत:हून आपल्या ‘असत्याच्या प्रयोगां’ची कबुली देणारे ‘सत्यम’ घोटाळ्याचे ‘प्रवर्तक’ बी. रामलिंग राजू (वय ६०) आणि त्यांचे भाऊ बी. रामा राजू यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी साडे पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला. सहा वर्षांपूर्वीच्या या घोटाळ्याने देशातील उद्योग जगताला जोरदार हादरा दिला होता.
देशातील या सर्वात मोठय़ा लेखापरीक्षण घोटाळ्यात राजू बंधूंसह अन्य आठ जणांनाही सात वर्षांची सक्तमजुरी तसेच २५ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे. या आठ जणांमध्ये माजी वित्तीय अधिकारी वडळमणि श्रीनिवास, ‘प्राइस वॉटर हाऊस’ या प्रख्यात आंतरराष्ट्रीय हिशेब तपासनीस संस्थेचे लेखापाल सुब्रमणि गोपालकृष्णन् आणि टी. श्रीनिवास यांचाही समावेश आहे. राजू यांनी कंपनीचा महसूल भरमसाट दाखवला आणि कंपनीची देणी त्या तुलनेत नाममात्र दाखवली. त्यांनी तब्बल सात हजार बनावट कंपन्या स्थापल्या. या कंपन्यांनी सत्यमची सेवा घेतल्याचे दाखवले. या कंपन्यांकडून सत्यमला मोठय़ा प्रमाणात येणे बाकी असल्याचे दाखविले गेले. या सर्व घोटाळ्यासाठी मग बँकेतही बनावट खाती तयार केली गेली आणि बनावट बँक ठेवीपत्रेही नावावर नोंदली गेली. कंपनीचा नफाही राजू यांनी सुमारे सहाशे कोटींनी वाढवून सांगितला. हा बोगस नफा गुंतवण्यासाठी दोन बोगस कंपन्या राजू यांच्या नातेवाईकांनी स्थापल्या. या दोन कंपन्यांच्या वतीने खरी गुंतवणूक करण्याचा प्रश्न आला तेव्हा राजू फसले आणि त्यांनी  गुंतवणूकदार आणि नियामक यंत्रणेला पत्र लिहून भ्रष्टाचाराची कबुली दिली.