अयोध्येतील राम मंदिरप्रकरणाबद्दल शिवसेनेने काही दिवसापूर्वीच मुखपत्र ‘सामना’मधून राममंदिर बांधा, नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला राम मंदिराच्या आश्वासनाची आठवण करुन देतं, २०१९ आधी राम मंदिर बांधण्यास सुरुवात करायला हवी अशी मागणी केली आहे.

राम मंदिर प्रकरणाबद्दल पक्षाची बाजू मांडताना राऊत यांनी राम मंदिराचा प्रश्न २०१९ आधी निकाली निघायला हवा. तसेच लवकरात लवकर मंदिराचे बांधकाम सुरु झाले पाहिजे. केंद्रात आणि राज्यात (उत्तर प्रदेश) दोन्हीकडे भाजपाच सत्तेत आहे. त्यामुळेच राम मंदिर बांधण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली. जर तिहेरी तलाक, एससी/एसटी प्रकरणामध्ये अध्यादेश निघू शकतात तर राम मंदिर प्रकारणी का नाही असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा राम मंदिराचा मुद्दाही पुन्हा डोकं वर काढतोय. राम मंदिर उभारण्यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या महंत परमहंस दास यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलं. अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात, पण राममंदिराच्या उभारणीबाबत एक शब्दही बोलत नाहीत अशी टीका केली. २०१९ च्या आधी राम मंदिराची उभारणी झाली नाही तर भाजपाला रामराम करण्याचा इशारा भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिला. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेनाही राम मंदिर विषयावर आक्रामक होताना दिसत आहे.