आजच्या घडीला रामदेवबाबांचा संपूर्ण विश्वात डंका आहे. बाबांचे कारनामे सर्वश्रुत आहेत. बॉलिवूडचा मॅचो मॅन रणवीर सिंगदेखील बाबांसमोर फिका पडल्याचे अनेकांनी पाहिले आहे. अलिकडेच एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो रामदेवबाबांच्या तावडीत सापडले. रामदेवबाबा आणि बाबुल सुप्रियो यांच्यामध्ये रंगलेल्या मुकाबल्यात आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पंचाची भूमिका निभावली. नमामि ब्रम्हपुत्र फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेण्यासाठी रामदेवबाबा गुवाहटीमध्ये आले होते. बाबुल सुप्रियोंनी त्यांच्यासोबत मंचावर उपस्थित असलेल्या रामदेवबाबांकडे काही योगमुद्रा शिकविण्याचा आग्रह धरला. त्यानंतर रामदेवबाबांनी बाबुल यांनादेखील आपल्यासोबत मुकाबला करण्यास भाग पाडले.

सैल कुर्ता आणि पायजमा परिधान केलेले बाबुल सुप्रियो रामदेवबाबांबरोबर मुकाबला करण्यासाठी तयार होतील, असे उपस्थितांना वाटले नव्हते. पहिल्यांदा पुशअपचे आव्हान रामदेवबाबांनी बाबुल सुप्रियोसमोर उभे केले. पुशअपचे नाव ऐकताच बाबुल यांनी लगेचच पुशअप मारण्यासाठी पोझिशन घेतली. त्यांचा उत्साह पाहून रामदेवबाबादेखील माईक बाजुला सारत पुशअप मारण्यासाठी सज्ज झाले.

आसनसोलचे भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी पुशअप मारण्यास सुरुवात करताच उपस्थित सर्वजण आश्चर्याने बघतच राहिले. बाबुल यांचा उत्साह उपस्थितांच्या चांगलाच नजरेत भरला. एका क्षणी ते हार मानतील असे उपस्थितांना वाटले, परंतु त्यांनी थांबण्याचे नावच घेतले नाही. पुशअप मारण्यामध्ये बाबुल सुप्रियोंनी रामदेवबाबांना कडवी झुंज दिली. पुशअपमध्ये बाबुल सुप्रियोंकडून बरोबरीची टक्कर मिळत असल्याचे पाहताच रामदेवबाबांनी पुशअप सोडून शीर्षासनाची मुद्रा धारण केली. बाबुल सुप्रियोंनी शीर्षासन मात्र केले नाही. असे असले तरी त्यांनी पुशअपमध्ये रामदेवबाबांना काटें की टक्कर देत उपस्थितांची मने जिंकली आणि आपणदेखील कोणापेक्षा कमी नसल्याचे सिद्ध केले.

रामदेवबाबांनी गतवर्षी अशाच प्रकारे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगलादेखील मंचावर आव्हान दिले होते. रणवीरनेदेखील रामदेवबाबांना चांगली टक्कर दिली होती. परंतु, नंतर हार मानत रामदेवबाबांसमोर हात जोडले होते.