नोएडाचे रहिवासी असणारे संजय रावत यांना ८ जुलै रोजी एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे मुलगी सुरक्षित परत करण्यासाठी खंडणीची मागणी केली. या फोनमुळे अस्वस्थ झालेल्या संजय रावत यांनी कोणताही पालक त्याक्षणी करेल तेच केलं आणि पोलीस स्टेशन गाठलं. पण संजय रावत यांनी काळजी वेगळी होती. कारण त्यांची मुलगी कशीश तीन वर्षांपुर्वी बेपत्ता झाली होती.

चार वर्षांची कशीश रावत घरासमोरुनच २०१६ रोजी बेपत्ता झाली होती. आता एक अनोळखी व्यक्ती फोन करुन त्यांच्याकडे खंडणी मागत आहे. संबंधित व्यक्ती वारंवार फोन करत असून मुलीच्या बदल्यात खंडणी मागत असल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे. मुलगी जिवंत हवी असेल तर १० लाख रुपये द्या अशी धमकी त्याने दिली आहे. कशीशच्या वडिलांनी नोएडा पोलिसांकडे मदत मागितली असून तक्रार दाखल केली आहे.

संजय रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबाला ८ जुलै ते १० जुलै दरम्यान अनेक फोन आले. दिवसाला जवळपास १० फोन करुन संबंधित व्यक्ती कुटुंबाला त्रास देत आहे. फोन करणारी व्यक्ती प्रत्येक फोन वेगवेगळ्या नंबरवरुन करत आहे. “माझी मुलगी कशीश पंजाबमध्ये असल्याचं कॉलरने सांगितलं आहे. जर मुलगी जिवंत हवी असेल तर १० लाख रुपये द्या अशी धमकी त्याने दिली आहे”, अशी माहिती संजय यांनी दिली आहे.

पोलिसांच्या हाती तपासाची सुत्रे
जेव्हा कुटुंबाने कशीशचा फोटो पाठवण्यास सांगितलं तेव्हा मात्र त्याने नकार दिला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून तपास सुरु केला आहे. ज्या फोन नंबरवरुन खंडणीसाठी फोन येत आहेत पोलीस त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कॉलर आपण पंजाबमध्ये असल्याचं सांगत असला तरी फोन नंबर तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधून आल्याचं समोर आलं असल्याचं पोलिसांनी सांगितल आहे. बेपत्ता झालेल्या मुलीचा फायदा घेत कोणीतरी कुटुंबाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असावा असा पोलिसांना संशय आहे.

२०१६ मध्ये काय झालं होतं ?
कशीश २०१६ मध्ये बेपत्ता झाली होती. १२ मे २०१६ रोजी संजय रावत यांनी पोलीस ठाण्यात कशीश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. घराबाहेर खेळत असताना मुलगी बेपत्ता झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पोलिसांनी त्यावेळी नोएडा, गाजियाबाद, दिल्ली, बुलंदशहर, मेरठ या ठिकाणांवर सर्च ऑपरेशन केलं होतं. पण काही माहिती मिळाली नव्हती. यावेळी कुटुंबाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निदर्शनही केलं होतं.