काश्मिरातील कथुआसह देशात इतर ठिकाणी घडलेल्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. कथुआच्या बलात्कार व खून प्रकरणाला धार्मिक वळण लागून देशभर असंतोष उफाळला आहे. मात्र, आसाममधील अशाच एका प्रकरणात ‘झाकीर हुसेन’ हा मुख्य आरोपी असल्याचे आणि पीडिताही त्याच्याच धर्माची असल्याचे भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी सांगितले. मात्र काही लोकांनी या मुद्दय़ावर सोयीस्कर मौन बाळगले असून इतर मुद्दे चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

आसामच्या नागाव जिल्ह्य़ातील एका खेडय़ात १२ वर्षांच्या पीडित मुलीच्या वडिलांसाठी कथुआची घटना किंवा आरोपीचा धर्म या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. ‘अल्ला, तू मला चाहत असशील, तर तिला बोलू दे’, असे स्वत:च्या जळालेल्या मुलीला पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडचे शब्द होते.

गेल्या २३ मार्च रोजी तीन आरोपींनी या मुलीच्या तोंडात बोळा कोंबून तिच्यावर सामूहिक अत्याचार केले, तिच्या अंगावर रॉकेल ओतले व तिला पेटवून दिले. गंभीररीत्या जखमी झालेल्या या मुलीला आधी नागावच्या एका रुग्णालयात व नंतर गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येण्यापूर्वी ती आरोपींची नावे सांगू शकली. त्याच रात्री तिचा मृत्यू झाला.

कनिष्ठ प्राथमिक शाळेतील पाचव्या वर्गाची विद्यार्थिनी असलेल्या या मुलीवर तीन वेळा बलात्कार करण्यात आला. १२ वर्षांचा तिचा वर्गमित्र, ११ वर्षांचा चुलतभाऊ आणि १९ वर्षांचा शेजारी झाकीर हुसेन असे तिघे या नीच कृत्यात सहभागी होते, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. हुसेन सध्या नागाव सेंट्रल जेलमध्ये असून दोन्ही अल्पवयीन मुलांना जोरहाटमधील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

घटनेच्या दिवशी ही मुलगी दुपारी शाळेतून परत आली, तेव्हा हुसेनच्या पुढाकारात तिन्ही मुले तिच्या मागावर होती. हुसेनने तिला मागून धरले, तिच्या तोंडात बोळा कोंबला आणि तिला जमिनीवर फेकले व तिच्यावर बलात्कार केला. यानंतर इतर दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. यानंतर हुसेनने घरातून रॉकेल आणून तिच्या अंगावर ओतले व नंतर तिला पेटवून दिले, असेही पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे.