दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या २२ वर्षीय पीडितेने पुन्हा एकदा आपली जबानी बदलली आहे. भोपाळमधील हनुमानगंज परिसरात ही घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या नव्या माहितीनुसार, आपल्यावर फक्त एका पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार केला होता. दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याशी आपण सहमतीनं शरिरसंबंध ठेवले होते.

महत्त्वाचं म्हणजे, पीडित तरुणीने पहिल्यांदाच आपला जबाब बदललेला नाहीये. तरुणीने सोमवारी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला होता. आपली मानसिक स्थिती योग्य नसल्याचाही दावा तिने केला होता.

तरुणीने सर्वात आधी योगेंद्र आणि यादवंश या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. योगेंद्र ट्राफिक पोलिसात असून यादवंश २९ बटालियनमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी शांती लॉजचं सीसीटीव्ही मिळवलं असून, यामध्ये तरुणी दोघांसोबत हसत खेळत आतमध्ये जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं आहे. ‘आम्ही दोघांनाही अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केलं आहे. आम्ही पीडितेची मानसिक स्थितीही तपासून पाहत आहोत, कारण आतापर्यंत तिने तीनवेळा जबानी बदलली आहे’, अशी माहिती पोलिसांना दिली आहे.