वाघांच्या सीमा आखलेल्या असतात आणि ते सहसा एकमेकांशी झगडत नाहीत. परंतु वाघांनी एकमेकांशी लढण्याचा दुर्मिळ प्रसंग मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये घडला आहे. एका वाघानं वृद्ध झालेल्या वाघिणीवर केवळ हल्लाच केला नाही तर तिचे भक्षणही केल्याची घटना घडली आहे. वाघानं दुसऱ्या वाघाला मारून खाल्याची ही नजीकच्या काळातली दुर्मिळ घटना आहे.

शनिवारी वाघिणीचे अवशेष वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जंगलात आढळले. “त्यांची प्रयोगशाळेत चिकित्सा केल्यावर हे अवशेष वाघिणीचे असल्याचे व तिला मारून खाण्यात आल्याचे लक्षात आले. तसेच ज्या श्वापदानं शिकार केली तो वाघ असल्याचेही तपासणीत आढळले आहे. अधिक माहिती मिळवण्यात येत आहे,” कान्हा अभयारण्याचे फिल्ड डायरेक्टर के. कृष्णमूर्तींनी सांगितले.

आपल्या क्षेत्राचे संरक्षण करण्यापलीकडे वाघांनी एकमेकांशी लढण्याचं कारण असू शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या प्रदेशात वाघांसाठी भरपूर खाद्य उपलब्ध असताना वाघानं दुसऱ्या वाघावर भक्ष्य म्हणून हल्ला करण्याचा हा अत्यंत दुर्मिळ प्रसंग असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. वनविभागाच्या टेहळणी पथकाला वाघिणीचे अवशेष आढळले. हत्तीवर बसून जंगलामध्ये फिरताना हे अवशेष आढळल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली.

वाघांच्या बछड्यांची वाघांनी शिकार करण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु संपूर्ण वाढ झालेल्या वाघाची वाघांनी शिकार करण्याचा प्रसंग आपल्याला तरी आठवत नसल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जंगली श्वापद सहसा आपल्याच जातीच्या दुसऱ्या श्वापदाची भक्ष्य म्हणून शिकार करत नाहीत. त्यामुळे वाघिणीची शिकार भक्ष्य म्हणून केली नसल्याची व अन्य कारणामुळे शिकार केल्याची शक्यता जास्त आहे. तसेच शिकार केल्यानंतर वाघानं मृत देहाचा अन्न म्हणून वापर केला असल्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेशाला वाघांचं राज्य म्हणून घोषित करण्यात आलं असून भारतातील एकूण वाघांच्या 20 टक्के व जगातील एकूण वाघांच्या 10 टक्के वाघ मध्य प्रदेशात आहेत.