पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्याच्या अवघ्या तीन तास आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या निर्णयाला हिरवा कंदिल दाखवला होता. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीची घोषणा करण्याच्या फक्त तीन तास आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या निर्णयाला अनुकूलता दर्शवली होती, असे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती दिली आहे. ‘नोटाबंदीच्या निर्णयाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ८ नोव्हेंबरला संध्याकाळी साडे पाच वाजता झालेल्या बैठकीत मंजुरी दिली,’ अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती अधिकारात दिली आहे. पंतप्रधान मोदींनी रात्री ८ वाजता देशवासियांशी संवाद साधत या निर्णयाची घोषणा केली. या घोषणेच्या केवळ तीन तास आधी रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीला मान्यता दिली होती. त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाला अंतिम मंजुरी मिळवून पंतप्रधान मोदींनी या निर्णयाची घोषणा केली.

‘नोटाबंदीवर चर्चा करताना रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळांतील किती जणांनी याला विरोध केला आणि किती जणांनी याचे समर्थन केले, याची माहिती कागदोपत्री उपलब्ध नाही,’ असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

१६ डिसेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल बोलताना उर्जा मंत्री पियुष गोयल यांनी नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी रिझर्व्ह बँकेच्या १० सदस्यीय समितीचा अभिप्राय घेण्यात आला होता, अशी माहिती दिली होती. यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, तीन डेप्युटी गव्हर्नर, आर्थिक व्यवहारांचे सचिव शक्तीकांता दास आणि काही प्रमुख लोकांचा समावेश होता.

दिवसाकाठी पाचशे आणि हजाराच्या किती नोटा छापल्या जात आहेत, या प्रश्नाचे उत्तर मात्र रिझर्व्ह बँकेने दिलेले नाही. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर मुद्रणालय दररोज किती तास सुरू ठेवली जात आहेत, याचे उत्तरही रिझर्व्ह बँकेने दिलेले नाही.