गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुरू केलेला संप गेल्या सहा-ते सात दिवसांपासून सुरूच आहे. या संपाला आता हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे दार्जिलिंगमध्ये तणाव वाढला आहे. आंदोलकांनी दगडफेक सुरू केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आवर घालण्याची सुरूवात केली. यामध्ये पोलीस आणि आंदोलक भिडले. ज्यामुळे एक अधिकारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हे आंदोलन म्हणजे एक ठरवून रचलेला कट आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच आम्ही आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहोत. मात्र हिंसा सहन करणार नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे.

भारतीय राखीव दलाचे असिस्टंट कमांडर टी.एम. तमांग यांचा या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. तमांग आणि गोरखा जनमुक्ती मोर्चा यांचे कार्यकर्ते भिडले. या कार्यकर्त्यांनी एका गाडीला आग लावली होती. ती नियंत्रणात आणण्यासाठी तमांग पुढे झाले. मात्र त्यानंतर आंदोलकांनी एका धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. ज्यात तमांग यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश चतुर्वेदी यांनी दिली आहे. तमांग यांच्या मृत्यूची बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र जमाव नियंत्रणात आला नाही. त्यांनी दगडफेक सुरूच ठेवली. त्यानंतर अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहितीही चतुर्वेदी यांनी दिली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास माझ्या घरावर छापेमारी केली. तसेच तोडफोड केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकावले, असा आरोप गोरखा जनमुक्ती मोर्चाचे सहाय्यक महासचिव बिनय तमंग यांनी केला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे आमदार अमर राय यांच्या मुलालाही पोलिसांनी अकारण अटक केली असेही तमंग यांनी म्हटले आहे. तर तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता देवराज याने गोरखा जनमुक्ती मोर्चावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. गोरखा जनमुक्तीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले तसेच घरांची तोडफोड केली असे गोरखा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप करून राजकारण होण्यास सुरूवात झाली आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या या बेमुदत आंदोलनामुळे आणि त्याला लागलेल्या हिंसक वळणामुळे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, टॉय ट्रेनची सेवा स्थगित करण्यात आली आहे. बंगाली भाषा राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला. त्यानंतर गोरखा जनमुक्ती मोर्चाने या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हे सरकारविरोधातले जाणीवपूर्वक षडयंत्र आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.