देशाच्या विकासासाठी सुधारणांची आवश्यकता असून गेल्या शतकातील काही कायदे हे चालू काळात ओझे बनले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. नवीन कृषी कायद्यांचा प्रत्यक्ष उल्लेख त्यांनी केला नाही.
सरकारचा र्सवकष सुधारणांवर विश्वास असल्याचे त्यांनी आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकाम शुभारंभप्रसंगी दूरसंवादाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले. सुधारणा या विकासासाठी आवश्यक आहेत. गेल्या शतकात जे कायदे चांगले वाटत होते ते आताच्या काळात अर्थहीन बनले असून ओझे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन कृषी कायद्यांबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले, की आधीच्या काळात सुधारणा या एकदम राबवण्यात आल्या नाहीत. सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असून त्यांचे जीवन सुकर करीत आहे. गुंतवणूक वाढत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा कमाल वापर केला जात आहे.
ते म्हणाले की, पायाभूत क्षेत्रातील प्रकल्प जाहीर केले जातात पण त्यासाठी निधीची तरतूद केली जात नाही ही मोठी समस्या होती ती आम्ही दूर केली. २७ शहरात १००० कि.मीच्या मेट्रो मार्गाची कामे सुरू असून सत्तेवर आल्यानंतर आम्ही अनेक पायाभूत प्रकल्प सुरू केले. बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात फसवणुकीमुळे विश्वासाची कमतरता होती त्यासाठी स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजे रेराची स्थापना सरकारने केली. काही बांधकाम व्यावसायिकांच्या कुहेतूंमुळे हा व्यवसाय बदनाम होत आहे. त्यातून मध्यमवर्गाची पिळवणूक होत असे आता त्यावर आम्ही उपाययोजना केली आहे. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आग्रा मेट्रो प्रकल्प २ मार्गिकांचा असून त्यासाठी ८३७९.६२ कोटी रुपये खर्च येणार आहे. आग्रा येथे दरवर्षी साठ लाख पर्यटक येतात, त्यांची सोय होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:28 am