१८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी को-विन संकेतस्थळ व आरोग्य सेतू अ‍ॅपवर २८ एप्रिलपासून सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

लसीकरणाची प्रक्रिया आणि लस घेण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे या बाबी यापूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.

लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण संपूर्ण देशभरात १ मेपासून सुरू होणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केले होते.

‘१८ वर्षांहून अधिक वयाच्या लाभार्थ्यांसाठी कोविन पोर्टल २४ एप्रिलपर्यंत अद्ययावत करण्यात येईल. १ मेपासून वेळ निश्चित करण्यासाठी या लाभार्थ्यांची नोंदणी २८ एप्रिल रोजी सुरू होईल’, असे ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले.

१ मेपासून, खासगी लसीकरण केंद्रांना सरकारकडून लशीच्या मात्रा मिळण्याची आणि त्यांनी त्यासाठी प्रत्येक मात्रेला २५० रुपये आकारण्याची सध्याची पद्धत बंद होईल आणि खासगी रुग्णालये या मात्रा थेट लस उत्पादकांकडून मिळवतील.

मुक्त किंमत आणि लसीकरण धोरणानुसार, आरोग्य कर्मचारी, करोनायोद्धे आणि ४५ वर्षांहून अधिक वयाचे नागरिक यांच्यासाठी सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये लस आताप्रमाणेच मोफत देण्यात येईल. या केंद्रांना केंद्र सरकारकडून लशीच्या मात्रा मिळतील.