टाळेबंदी २.० मुळे रेल्वेची १५ एप्रिल ते ३ मे दरम्यानच्या प्रवासासाठी नोंदण्यात आलेली ३९ लाख तिकिटे रद्द करण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीची मुदत ३ मे पर्यंत वाढवल्याने प्रवासी रेल्वे सेवा बंद राहणार आहे.

१४ एप्रिलनंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू होईल या अंदाजाने लोकांनी मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे तिकिटांची नोंदणी केली होती. पण टाळेबंदी २१ दिवसांच्या पहिल्या टप्प्यानंतरही वाढल्याने या नोंदणी केलेल्या प्रवाशांना तिकिटे रद्द करणे क्रमप्राप्त झाले आहे. एकूण ३९ लाख तिकिटे रद्द करण्याची वेळ आता आली आहे. जर टाळेबंदी वाढण्याची शक्यता होती तर रेल्वेने तिकीट बुकिंग म्हणजे नोंदणी चालू का ठेवली असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

भारतीय रेल्वेने म्हटले आहे, की प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत दिले जाणार असून ज्यांनी ऑनलाइन तिकिटे काढली त्यांना पैसे लगेच परत मिळतील. ज्यांनी तिकिट खिडकीवर जाऊन तिकिटे काढली, त्यांना ३१ जुलैपर्यंत पैसे परत घेता येतील. अजून ज्या गाडय़ा रद्द केलेल्या नाहीत पण त्याची तिकिटे लोकांनी काढली असतील ती रद्द केल्यास परतावा मिळणार आहे.