भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी कोलकातामध्ये आपल्या जाहीर सभेत बंगाली भाषेत भाषणाला सुरूवात करून उपस्थितांसमोर पश्चिम बंगालचे देशातील महत्व पटवून देत बंगाल प्रशासनावर चौफेर टीका केली.
पश्चिम बंगालच्या भूमीशी गुजरातचे अतूट नाते असल्याचे म्हणत या राज्याचीही गुजरातशी तुलना केली. स्वामी विवेकानंद भारत भ्रमणादरम्यान सर्वाधिक वेळ गुजरातमध्ये वास्तव्यास होते असेही मोदी म्हणाले.
पश्चिम बंगालमधील समस्यांचा विस्तृत आढावा घेत मोदींनी यावेळी ममता बॅनर्जी सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
मोदी म्हणाले, “तुम्ही राज्याची सत्ता ‘त्यांच्या’ हाती देऊन बघितलीत, पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपला देऊन बघा. भविष्यात भाजप आणि बंगालचे राज्यसरकार यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या कामांची तुम्हीच तुलना करा, आमच्यात विकासकामे करण्याची स्पर्धा होऊ द्या बघूया कोण कीती विकासकामे करतो?” असे म्हणत बंगाल जनतेचा लोकसभा निवडणुकांसाठी विश्वास प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न मोदींनी केला. तसेच सोनिया गांधी बंगालच्या भूमीत जन्मलेल्या प्रणव मुखर्जींना पंतप्रधान करू शकल्या असत्या परंतु, प्रणवदांचा विचार न करता मनमोहन सिंग यांने पंतप्रधानपद सोनियांनी कायम ठेवले आणि  काँग्रेसने प्रणव मुखर्जींना या पदापासून वंचित ठेवले. पंतप्रधानपदासाठी काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्याआधी प्रणव मुखर्जींचा यापदासाठी विचार केला पाहिजे होता असेही मोदी म्हणाले.
भारताच्या जडणघडणीत पश्चिम बंगालचे नेहमी महत्वपूर्ण योगदान राहीले आहे. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवायेच असेल तर बंगालला पुन्हा एकदा राष्ट्रगुरूच्या स्थानावर विराजमान करावे लागले असेही मोदी म्हणाले. त्याचबरोबर तुम्ही परिवर्तनाला मतदान केलेत, पण परिवर्त झाले का? असा सवाल उपस्थित करत मोदींनी तृणमूल काँग्रेस प्रशासनावर टीका केली. तसेच तुम्ही ममता बॅनर्जींना निवडुन दिलेत त्याही विकासकामे करतील तसेच मला दिल्लीत मला निवडुन द्या मीही बंगालच्या विकासकामांना मदत करेन आणि तिसऱया बाजूला बंगालचेच प्रणव मुखर्जी राष्ट्रपती म्हणून बंगालची सेवा करतील अशाप्रकारे पश्चिम बंगाल जनतेला तिन्ही बाजूने फायदा असल्याचे म्हणत येथील लोकसभेच्या सर्व जागांवर भाजपलाच विजयी करा असेही मोदी म्हणाले.